सी. टी. रवी यांना मारण्याचा होता कट
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे स्फोटक विधान
प्रतिनिधी/ बेंगळूर
विधानपरिषद सदस्य सी. टी. रवी यांना फेक एन्कांटरद्वारे संपविण्याचा पोलिसांचा कट होता, असे स्फोटक विधान केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले आहे. हुबळीत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, फेक एन्कांटर करण्याचा हेतू होता. मी शनिवारीही वक्तव्य केले होते आणि आजही सांगत आहे. कोणताही उद्देश नसताना त्याला उसाच्या शेतात का नेले?, मीडिया मागे नसते तर काय झाले असते. सी. टी. यांना मारण्याचा कट रचला जात होता. सीटी रवी यांच्या विधानाच्या आधारे मी बोललो आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संधी मिळाल्यास सी. टी. रवी यांना संपविण्याचा हेतू होता. मात्र, योग्य संधी मिळाली नाही. भाजपचे विधानपरिषद सदस्य केशव प्रसाद त्यांच्या मागे असले तरी आम्हाला सी. टी. रवी यांचे लाईव्ह लोकेशन मिळत नव्हते. काही प्रसारमाध्यमेही त्यांच्या वाहनाच्या मागे होती. अन्यथा, रवी यांचे फेक एन्कांटर झाले असते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
बेळगावातील घटनेला यडा मार्टिन जबाबदार
बेळगाव शहर पोलीस आयुक्त यडा मार्टिन पदासाठी अनफिट आहेत. बेळगावातील सुवर्णसौध येथे घडलेल्या घटनेला थेट पोलीस आयुक्त याडा मार्टिन जबाबदार आहेत. सुरक्षा पुरवण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. असे लोक पदावर राहण्यास अयोग्य आहेत. आपण लोकसेवेत आहोत हे विसरून ते प्रवक्त्यासारखे वागले. प्रथम राज्य सरकारने पोलीस आयुक्त यडा मार्टिन यांना सेवेतून निलंबित करावे. त्यांच्या विरोधात केंद्र सरकारकडे तक्रार करण्याचा विचार करत असल्याचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.