विवाह करण्याचा जडला होता छंद
तुम्ही आसपास अनेक विवाह केलेले लोक पाहिले असतील. परंतु जगात सर्वाधिक विवाह करणाऱ्या महिलेबद्दल तुम्हाला माहिती आहे का या प्रश्नाचे उत्तर तुम्ही नाही असे द्याल. एका महिलेने एक किंवा दोन नव्हे तर दोन डझन विवाह केले आहेत. अमेरिकेतील लिंडा वोल्फ अशी महिला आहे जिने 23 वेळा विवाह केला आहे. लिंडा स्वत:च्या या अनोख्या विक्रमासाठी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवून आहे. लिंडा वोल्फने पहिला विवाह वयाच्या 16 व्या वर्षी केला होता, परंतु हे नाते फारकाळ टिकू शकले नाही. ज्यानंतर तिने वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक विवाह केला. तिचे काही विवाह तर काही महिन्यांपुरतीच टिकले तर काही विवाहांनी काही वर्षांचा पल्ला गाठला.
लिंडाचे वैवाहिक जीवन अत्यंत अस्थिर राहिले. तिची अनेक नाती घटस्फोटामुळे संपुष्टात आली तर काही प्रकरणांमध्ये पतींचा मृत्यू झाला. तर काही प्रकरणांमध्ये तिने स्वत:च विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. तसेच तिने एकदा एखाद्या जोडीदाराला सोडल्यावर परत त्याच्यासोबत विवाह केला नाही.
लिंडा वोल्फचा सर्वात कमी काळ टिकलेला विवाह केवळ 36 तासांचा होता. तर सर्वाधिक काळ टिकणारा विवाह 7 वर्षांचा होता. तिने ज्या पुरुषांसोबत विवाह केला त्यातील काही जण सामान्य जीवन जगत होते, तर काही खास ओळख बाळगून होते. मला विवाह करण्याची सवयच लागली होती. मी एकटी राहण्यास घाबरू लागले होते आणि याचमुळे वारंवार विवाह करण्याचा निर्णय घेतला असे लिंडाने एका मुलाखतीत सांगितले होते. परंतु लिंडा स्वत:च्या अखेरच्या काळात एकटीच राहत होती. स्वत:च्या अखेरच्या विवाहानंतर लिंडाने एकटेच राहण्याचा आणि विवाह न करण्याचा निर्णय घेतला होता. स्वत:च्या या असामान्य प्रवासाला मागे टाकत ती शांत जीवन जगत होती. वयाच्या 69 व्या वर्षी तिचा 2009 साली मृत्यू झाला होता.