बॉम्बस्फोट घडवून दहशतवादी नासीरच्या सुटकेचा होता कट
एनआयएच्या चौकशीतून आणखी एक धक्कादायक बाब उघडकीस
बेंगळूर : एनआयएच्या पथकाने मंगळवारी बेंगळूर व कोलारमधून तिघा संशयितांना अटक केली होती. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या दहशतवादी टी. नासीरशी त्यांचे लागेबांधे असल्याचे उघडकीस आले होते. आता आणखी एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. बेंगळूरमध्ये बॉम्बस्फोट घडवून नासीरला कारागृहातून बाहेर काढण्याची योजना आखली होती, असे चौकशीतून समोर आले आहे. बेंगळूरमध्ये 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात लष्कर ए तोयबा या संघटनेचा दहशतवादी टी. नासीर हा जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. थ्याने परप्पन अग्रहार कारागृहातच विविध आरोपींचा गट तयार करून त्यांच्यामार्फत घातपाती कृत्ये करण्याचे कारस्थान रचले होते.
त्यांना सहकार्य करणाऱ्या तिघांना मंगळवारी एनआयएने अटक केली होती. त्यांच्या चौकशीवेळी नासीरने आपण कारागृहात तयार केलेल्या टोळीच्या मदतीने निसटण्याची योजना बनविली होती, असे उघड झाले आहे. हा कट यशस्वी होण्यासाठी एएसआय चांद पाशा याने मदतीचे आश्वासन दिले होते. चांद पाशा हा नासीरला बेंगळूर, केरळ आणि इतर राज्यांमधील न्यायालयात हजर करण्यासाठी नेत असल्याची माहिती फरार संशयित दहशतवादी जुनैदला देत होता. त्या मोबदल्यात नासीरकडून चांद पाशाला पैसेही दिले जात होते. कारागृहातून न्यायालयात नेत असताना बॉम्बस्फोट घडवून फरार होण्यासाठी नासीरने कारागृहातच योजना बनविली होती. नासीरच्या बंदोबस्तासाठी नेमले असल्याने कोणत्या मार्गाने नासीरला न्यायालयात नेले जाईल, याची माहिती चांद पाशाला होती. परंतु 2023 मध्ये हे कारस्थान बेंगळूरच्या सीसीबी पोलिसांनी उधळून लावले होते.