आर्मी स्पेशल ट्रेनचा अपघात घडविण्याचा होता कट
मध्यप्रदेशातील घटना : तपास यंत्रणांनी घेतली धाव
वृत्तसंस्था/ बुरहानपूर
मध्यप्रदेशच्या बुरहानपूर जिल्ह्यातील दिल्ली-मुंबई रेल्वेमार्गावर नेपानगरनजीक धक्कादायक प्रकार घडला आहे. जम्मू-काश्मीरमधून कन्याकुमारीच्या दिशेने धावणाऱ्या सैन्याच्या एका विशेष रेल्वेसमोर स्फोट झाला आहे. स्फोटाचा आवाज ऐकताच चालकाने त्वरित रेल्वे रोखली आणि याची माहिती नजीकच्या रेल्वेस्थानक प्रमुखाला देण्यात आली. हा प्रकार कळल्यावर तपास यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हे प्रकरण रेल्वे आणि सैन्याशी निगडित असल्याने अधिकाऱ्यांनी यावर काहीही बोलणे टाळले आहे.
18 सप्टेंबर रोजी काश्मीरमधून कन्याकुमारीच्या दिशेने जाणारी रेल्वे नेपानगरच्या सागफाटानजीक पोहोचल्यावर रेल्वेगाडीसमोर स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला. संबंधित रेल्वेंमधून सैनिक प्रवास करत होते. विस्फोटाचा आवाज ऐकू आल्यावर चालकाने रेल्वे रोखली होती. परंतु रेल्वेला कुठल्याही प्रकारचा धोका नसल्याचे आढळून आल्यावर ती रवाना करण्यात आली. याप्रकरणी भुसावळ जंक्शन येथे रेल्वेचालकाने तक्रार नोंदविली आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहता सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
सागफाटा रेल्वेस्थानकानजीक रेल्वेमार्गावर काही अज्ञातांनी विस्फोटके पेरली होती. याचदरम्यान आर्मी स्पेशल ट्रेन तेथून जात असताना विस्फोटाचा आवाज ऐकू आला. घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्यांसमवेत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. राष्ट्रीय तपास यंत्रणांचे अधिकारीही याप्रकरणी तपास करत आहेत. याप्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. परंतु प्रकरण गंभीर असल्याने याबद्दल गुप्तता बाळगली जात आहे.
नेपानगरमध्ये रेल्वेमार्गावर डेटोनेटर पेरण्यात आले होते. रेल्वे पोहोचण्यापूर्वीच डेटोनेटरचा स्फोट झाल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. ही घटना समोर आल्यावर खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आहेत.