For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजप कार्यालय उडवून देण्याचा होता कट

10:04 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजप कार्यालय उडवून देण्याचा होता कट
Advertisement

रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणी एनआयएच्या आरोपपत्रात धक्कादायक उल्लेख

Advertisement

बेंगळूर : बेंगळूरच्या व्हाईटफिल्ड येथील दि रामेश्वरम कॅफेतील बॉम्बस्फोट प्रकरणासंबंधी राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) सोमवारी उच्च न्यायालयात 3000 पानी आरोपपत्र सादर केले आहे. त्यात विदेशामध्ये स्फोटाचा कट आणि बेंगळूरमधील भाजपचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक बाब नमूद करण्यात आली आहे. आरोपपत्रात 5 जणांवर आरोप करण्यात आले आहेत.मुसावीर हुसेन शाजीब, अब्दुल मतीन ताहा, माज मुनीर, शोएब मिर्झा, मुजम्मिल शरीफ या संशयित दहशतवाद्यांविरुद्ध आरोप करण्यात आले आहेत.

रामेश्वरम कॅफे हे संशयित दहशतवाद्यांचे मुख्य टार्गेट नव्हते. अयोध्येतील राममंदिर उद्घाटनाच्या दिवशी मल्लेश्वरममधील राज्य भाजपच्या मुख्य कार्यालयात स्फोट घडविण्याचा कट रचला होता. मात्र, हा प्लॅन अपयशी ठरल्यानंतर त्यांनी आयटी कंपन्यांचे कर्मचारी अल्पोपहार, भोजनासाठी गर्दी करणाऱ्या रामेश्वरम कॅफेची निवड केली, अशी धक्कादायक बाब एनआयएच्या आरोपपत्रातून बाहेर आली आहे.मुसावीर हुसेन शाजीब याने कॅफेमध्ये बॉम्ब ठेवला होता. तर स्फोटामागील मास्टरमाईंड अब्दुल मतीन ताहा हा होता. अब्दुल मतीन ताहा हा स्फोट घडविण्यासाठी इतर सहकाऱ्यांशी थेट संपर्कात होता. ‘कर्नल’ या सांकेतिक नावाने ओळखला जात होता.

Advertisement

लष्कर-ए-तोयबा (एलईटी) प्रकरणात सहभागाच्या आरोपावरून शिक्षा भोगल्यानंतर शोएब मिर्झा हा पुन्हा दहशतवादी कृत्यांमध्ये गुंतला होता. त्याने रामेश्वरम कॅफेतील स्फोटातही सहभाग घेतला, असा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. 2018 मध्ये शोएब मिर्झा याने अब्दुल मतीन ताहा याच्याशी मैत्री केली. नंतर विदेशातील ऑनलाईन हॅन्डलरशी ओळख करून दिली. हॅन्डलर आणि ताहा यांच्यातील संपर्कासाठी मिर्झाने इनक्रिप्ट केलेला ई-मेल आयडी देखील पुरविला. कॅफेमध्ये बॉम्ब ठेवणारा शाजीब हा युवकांना आमिष दाखवून आयएसआयएस या दहशतवादी संघटनेत सामील करून घेत होता.

आणखी दोघे संशयित दहशतवादी माज मुनीर आणि मुजम्मिल शरीफ हे क्रिप्टो करेन्सीद्वारे साहाय्य करत होते, असा उल्लेखही आरोपपत्रात करण्यात आला आहे. 1 मार्च 2024 रोजी एचएएल पोलीस स्थानक हद्दीत रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. या घटनेत 10 जण जखमी झाले होते. मुसावीर याने ग्राहकाचे सोंग घेऊन हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला होता. स्फोटामागील मास्टरमाईंड अब्दुल मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन शाजीब यांना कोलकाता येथे अटक करण्यात आली होती.

Advertisement
Tags :

.