For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तान निवडणुकीतील गैरप्रकारांची चौकशी व्हावी

06:22 AM Feb 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तान निवडणुकीतील गैरप्रकारांची चौकशी व्हावी
Advertisement

अमेरिकेची मागणी : पंतप्रधान-सभापती पदावर दावा करणार पीटीआय/ वृत्तसंस्था

Advertisement

इस्लामाबाद

पाकिस्तानात 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. यामुळे आता तेथे सरकार स्थापन करण्यासाठी नवाज शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लीम लीग-एन आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी आघाडी करू पाहत आहेत. परंतु पीपीपीच्या नेत्यांनी नवाज शरीफ यांच्या पक्षासोबत आघाडी न करण्याची मागणी नेतृत्वाकडे केली आहे. अमेरिकेने पाकिस्तानला निवडणुकीतील गैरप्रकारांची चौकशी करविण्यास सांगितले आहे.

Advertisement

दोन्ही पक्ष सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा करत असल्याचे समोर आले आहे. याच्या अंतर्गत 5 वर्षांच्या कार्यकाळातील 3 वर्षे शाहबाज शरीफ तर 2 वर्षे बिलावल भुट्टो झरदारी हे पंतप्रधान होणार आहेत. पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीत एकूण 336 जागा आहेत. यातील 265 जागांकरता निवडणूक झाली असून एका मतदारसंघातील मतदान रद्दबातल ठरविण्यात आले. तर अन्य एका मतदारसंघातील निकाल रद्द करण्यात आला आहे. येथे 15 फेब्रुवारीला पुन्हा मतदान होणार आहे. तर उर्वरित 70 जागा या राखीव आहेत.

पाकिस्तानी रुपया कमकुवत

पाकिस्तानातील राजकीय अस्थिरतेदरम्यान तेथील चलन म्हणजेच पाकिस्तानी रुपया कमकुवत झाला आहे. 9-13 फेब्रुवारी या कालावधीत पाकिस्तानी रुपयाच्या मूल्यात मोठी घसरण झाली आहे. आता डॉलरच्या तुलनेत  चलनाचे मूल्य 279.50 पाकिस्तानी रुपये झाले आहे.

राष्ट्रपतींची पीटीआयने घेतली भेट

इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयने निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे. पीटीआयचे समर्थन मिळवून विजयी झालेले 93 उमेदवार अन्य कुठल्या पक्षात सामील होणार की नाही याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. तरीही पक्षाने पंतप्रधान आणि सभापती पदावर दावा दर्शविला आहे. पक्षाने राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्याशी चर्चा करत निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.

मान्यता देऊ नका

पाकिस्तानने निवडणुकीतील गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी करणे आवश्यक आहे. लोकशाहीच्या दृष्टीकोनातून हे पहिले पाऊल ठरणार असल्याचे अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी म्हटले आहे. विदेश मंत्रालयाने पाकिस्तानच्या निवडणुकी निकालांना मान्यता देऊ नये असे आवाहन अमेरिकेचे खासदार स्टीव्हन हॉर्सफोर्ड यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.