पुतळ्यासोबत विचारांचे स्मारक झाले पाहिजे
खंडाळा :
थोर माणसांचे कार्य कधीही संपत नाही, त्यांचे स्मारक उभा करत असताना पुतळ्यासोबतच विचारांचेही स्मारक झाले पाहिजे. सावित्रीबाई फुले यांची आणखी पाच वर्षांनी द्विशताब्दी साजरी होणार आहे. त्यापूर्वी त्यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करा. त्यासाठी प्रशासनाने 10 एकर जमिनीचे तात्काळ अधिग्रहण करावे, असे निर्देश देऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानाला साजेशा भव्य स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव येथे दिली.
खंडाळा तालुक्यातील नायगांव येथे ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन व सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंती उत्सवास पार पडला. प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळी यांच्या असलेल्या स्मारकास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यांनतर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टीचीही पाहणी केली. या ठिकाणी स्मारक उभारणी आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमात विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये ब वर्ग पर्यटन क्षेत्रांतर्गत उभारण्यात आलेल्या शासकीय प्रतिक्षालयाचे उद्घाटन, जलजीवन मिशन अंतर्गत वॉटर एटीएमचे उद्घाटन, महाज्योतीच्या विविध योजनांच्या प्रदर्शन दालनांचे उद्घाटन, महिला बचतगटांच्या उत्पादित वस्तूंच्या विक्री स्टॉल्सचे उद्घाटन, जिल्हा परिषद शाळेतील निबंध चित्रकला व वकृत्त्व, स्पर्धेतील विजेते, विद्यार्थी यांच्या बक्षिस वितरण, यशस्वी महिलांचा सन्मान करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, आ. छगन भुजबळ, आ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, आ. सचिन पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार मदन भोसले, खंडाळ्याचे तहसिलदार अजित पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, निलेश घुले, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, प्रकाश बोंबले, गटशिक्षण अधिकारी गजानन आड, नायगावच्या सरपंच स्वाती जमदाडे, ग्रामसेवक सुनिल कुदळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
सावित्रीबाईंनी दाखवलेल्या सन्मार्गावर चालून विकास करू-मुख्यमंत्री
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दाखवलेल्या सन्मार्गावर चालून शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचे काम करू. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जिवंत स्मारक म्हणजे सक्षम महिला होय. त्यांचा विचार समाजात तळागाळापर्यंत रुजवून स्वयंपूर्ण व स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभारणाऱ्या महिला घडविण्याचे कार्य शासन करेल. या देशावर, महाराष्ट्रावर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे फार मोठे उपकार आहेत, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्या काळात स्त्रियांना गुलामाप्रमाणे वागणूक मिळत होती. त्या काळात समाजातील विषमता दूर करून समतेचे बीजारोपण करण्याचे कार्य फुले दांपत्याने केले. शिव्या शाप, शेण गोळे खावे लागले तरी सावित्रीबाई फुले यांनी न डगमगता स्त्रियांना गुलामीतून बाहेर काढण्यासाठी शिक्षणाची ज्योत पेटवली.समाज परिवर्तनाच्या अनेक चळवळींचे नेतृत्व सावित्रीबाई फुले यांनी केले, याची कबुली स्वत: महात्मा फुले यांनी अनेकदा दिलेली आहे. थोर माणसांचे कार्य कधीही संपत नाही.
नायगावच्या विकासासाठी प्रयत्न अखंड सुरू राहणार-मंत्री मकरंद पाटील
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील म्हणाले, 1 जानेवारी 1848 ला मुलींच्या पहिल्या शाळेची सुरुवात करून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी वर्षानुवर्ष प्रगतीपासून दूर असणाऱ्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यास सुरुवात केली. फुले दांपत्याने समाजाला दिशा दाखवण्याबरोबरच अंध:कारातून व अंधश्रध्देतून बाहेर काढले. आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत याचे श्रेय फुले दांपत्याचे आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थळ असलेल्या नायगावच्या विकासासाठी आतापर्यंत जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले आहेत, यापुढेही ते अखंड सुरू राहतील. नायगाव हे आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र व्हावे यासाठी प्रयत्न केले जातील.
फुले दाम्पत्यांच्या साहित्याचे पुनर्मुद्रण व्हावे-आ. छगन भुजबळ
आमदार छगन भुजबळ यांनी फुले दांपत्याचा विरोध हा ब्राह्मण्यवादाला होता, कोणत्या जातीपातीला नव्हता असे सांगून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा उल्लेख केला. त्यांच्या जीवनातील महत्त्वाची ठिकाणे जोडण्याचे काम मार्गी त्वरित लावावे, तसेच सावित्रीबाई फुले यांच्या नावे देण्यात येणारा पुरस्कार हा 3 जानेवारी रोजी नायगाव येथील कार्यक्रमातच दिला जावा, फुले दांपत्याच्या साहित्याचे पुनर्मुद्रण व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली.
नायगावला ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा. त्याचप्रमाणे नायगाव ते चाहुरवस्ती रस्त्यासाठी निधी देत, तालुक्यातील कारखानदारीत स्थानिक भूमीपूत्रांना संधी मिळावी. अशी मागणी नायगावच्या सरपंच स्वाती जमदाडे यांनी प्रास्ताविकातून केली. शेवटी सर्व उपस्थितांचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आभार मानले.