चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांना अभय?
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत भूमिका
प्रतिनिधी/ मुंबई
बीड सरपंच हत्या प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर विरोधकांनी राज्यपालांकडे तक्रार करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र धनंजय मुंडे यांनी आज अजित पवारांची भेट घेतल्यानंतर एसआयटी चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि सत्य बाहेर येईपर्यंत मुंडे यांनी राजीनामा देण्याची गरज नसल्याची भूमिका अजित पवार यांची असल्याचे सांगितले जात आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी विरोधकांकडूनही धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. विरोधकांच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यांकडे धनंजय मुंडे यांच्याबाबत तक्रार करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही दबाव वाढला आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांनी आज दुपारी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावा नाही, तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मत असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणात एसआयटी चौकशी, न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत कारवाई नाही, असेही त्यांचे मत असल्याचे सांगण्यात येत आहे. न्यायालयीन चौकशी, एसआयटी आणि सीआयडी चौकशी होईपर्यंत कारवाई नाही. तीनही चौकशींमध्ये जो दोषी असेल, त्यावर कारवाई करणार, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांची असल्याचे समजते. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचा सध्या तरी राजीनामा घेतला जाणार नाही, असे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, अजित पवार यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार यांची भेट घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर माझ्या खात्यासंदर्भात दोन - तीन बैठका झाल्या आहेत, काही निर्णय घेतले आहेत. त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणावर कोणतीही चर्चा झाली नाही. कोणी काय आरोप करावेत हा ज्याचा त्याचा विषय आहे. लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिला आहे. त्यामुळे प्रत्येकाचे तोंड धरता येत नाही. पोलीस यंत्रणा काम करत आहे. माझ्याकडे जेव्हा संशयाने पाहिले जाते, तेव्हा या संदर्भात मी अधिक बोलणे योग्य नाही. तपास यंत्रणांचा तपास पूर्ण होऊ द्या. तपास यंत्रणा काम करत आहेत, असे ते म्हणाले.
अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीबाबत आमदार सुरेश धस म्हणाले, अशा भेटी होतात त्यावेळी सांगायचे एक असते आणि अंदर की बात दुसरीच असते. आम्ही काय आज राजकारणात आलो की काय? अजित पवार आणि धनंजय मुंडे हे मोठ्या माणसांचे पुतणे आहेत. आम्ही लहाण माणसं आहोत. अजितदादांना धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा नसेल तर आणखी एखादे खाते त्यांच्याकडे द्यावे. वित्त आणि नियोजन दादांकडे आहे. वित्त ठेवून नियोजनाचा पार्ट धनुभाऊंकडे द्यावा, किंवा वित्तही द्यावे, आमची काहीही हरकत नाही.