मंत्रिमंडळात कोणतेच फेरबदल नाहीत
मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे स्पष्टीकरण : मंत्रिमंडळ पुनर्रचनेच्या अफवांना दिले उत्तर
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य मंत्रिमंडळात कोणतेच फेरबदल होणार नाहीत. कुठेही फेरफार नाही. मी स्वत: मुख्यमंत्री याबाबत स्पष्टीकरण देत आहे. तुमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का, असा सवाल करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रविवारी मंत्रिमंडळ फेरबदलाच्या अफवांना उत्तर दिले. गृह कार्यालय कृष्णा येथे पत्रकारांशी ते बोलत होते. एआयसीसी नेत्यांसोबतच्या बैठकीत मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्याबाबत चर्चा झाल्याच्या प्रश्नावर त्यांनी वरील उत्तर दिले आहे.
विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपताच काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ पुनर्रचनेची मागणी जोर धरू लागली होती. त्यामुळे यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार गेल्या आठवड्यात दिल्लीला जाऊन मंत्रिमंडळ पुनर्रचनेबाबत वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जात होते. राज्यात मुडा आणि वाल्मिकी निगमच्या घोटाळ्यांची जोरदार चर्चा होत असतानाच मंत्रिमंडळ पुनर्रचनेच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर विविध अर्थ काढले जात होते. मात्र, रविवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी केलेल्या स्पष्टीकरणामुळे याला पुर्णविराम मिळाला आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढे म्हणाले, आमचे राष्ट्रीय नेते राज्यात आले असून पक्षश्रेष्ठींसोबतची रविवारची बैठक ही सामान्य बैठक आहे. त्यांच्याशी केवळ विविध विषयांवर चर्चा झाली आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळात कोणतेच फेरबदल होणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. भाजप-निजदच्या म्हैसूर चलो पदयात्रेच्या मुद्यावर बोलताना, मी पदयात्रेबद्दल आधीच सांगितले आहे. ही राजकीय प्रेरित पदयात्रा आहे. हा राजकीय अजेंडा असल्याचीही टीका त्यांनी केली. काँग्रेसचे प्रधान सचिव के. सी. वेणुगोपाल आणि प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी रविवारी आले होते. त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासोबत बैठक घेऊन विविध राजकीय मुद्यांवर चर्चा केली आहे.