For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घरपट्टी सवलतीबाबत अद्याप कोणताच आदेश नाही

11:24 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
घरपट्टी सवलतीबाबत अद्याप कोणताच आदेश नाही
Advertisement

आजचा एकच दिवस सवलतीचा : आदेशाकडे साऱ्यांचे लक्ष

Advertisement

बेळगाव : महानगरपालिकेच्या नवीन आर्थिक वर्षाला 1 एप्रिलपासून प्रारंभ होतो. एप्रिल महिन्यामध्ये घरपट्टी भरल्यास 5 टक्के सवलत दिली जाते. आता केवळ एकच दिवस त्यासाठी अवधी उरला आहे. मात्र विविध समस्यांमुळे अनेकांना घरपट्टी भरता आली नाही. त्यामध्ये वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप तरी याबाबत सरकारकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे महानगरपालिकेतील महसूल विभागाने स्पष्ट केले. एप्रिल महिन्यामध्ये घरपट्टी भरल्यानंतर सवलत मिळते. त्याचा लाभ घेण्यासाठी शहरातील जनता नेहमीच पुढे असते. पहिल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात घरपट्टी जमा होते. मात्र यावर्षी सुरुवातीपासूनच घरपट्टी भरताना विविध समस्या निर्माण झाल्या. ऑनलाईन समस्येबरोबरच चलन न मिळणे, घरपट्टीमध्ये झालेली वाढ यामुळे घरपट्टी भरणे अनेकांना अशक्य झाले. सुरुवातीला ऑनलाईन घरपट्टी भरण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र ती वेबसाईटच बंद असल्यामुळे तब्बल 15 दिवस घरपट्टी भरता आली नाही. त्यानंतरही सर्व्हर बिझीच्या समस्येमुळे जनता हैराण झाली होती.

ऑनलाईन समस्या निर्माण झाल्याने चलनद्वारे घरपट्टी भरण्यासाठी सारेच धडपडत होते. मात्र यासाठी महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयामध्ये सकाळपासून रांगेमध्ये उभे रहावे लागत होते. रांगेत उभे राहून चलन घेतल्यानंतर त्यामध्ये अनेक चुका असल्याचे दिसून आले. त्यामुळे पुन्हा महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाकडे धाव घ्यावी लागत होती. यामध्ये बराच वेळ वाया जात होता. त्यामुळे अनेकजणांनी कंटाळून घरपट्टी भरण्याचे थांबविले. तेव्हा किमान एक महिना तरी सवलतीमध्ये वाढ करावी, अशी मागणी होत आहे. महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात कर जमा होत आहे. घरपट्टीबरोबरच सदनिकांचाही कर जमा केला जात आहे. सदनिकधारकांना तर शेवटच्या टप्प्यातच चलन देण्यात आले आहे. त्यामुळे दोन टक्केही सदनिक मालकांनी घरपट्टी भरली नाही. याचाही विचार करावा आणि त्यामध्ये वाढ करावी, अशी मागणी होत आहे. सोमवारी याबाबत महसूल विभागाकडे विचारले असता अद्याप तरी याबाबत कोणताच आदेश आला नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.