For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भामट्यांकडून आता वीजबिलाच्या नावे फसवणूक

11:17 AM May 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
भामट्यांकडून आता वीजबिलाच्या नावे फसवणूक
Advertisement

बिल भरले नसल्याने ग्राहकांच्या मोबाईलला मेसेज : वीजग्राहकांना गंडविण्याचा प्रकार

Advertisement

बेळगाव : ‘दुनिया झुकती हैं, झुकानेवाला चाहिए’ अशी परिस्थिती सध्या सर्वत्र निर्माण झाली आहे. बोगस मेसेज पाठवून त्याद्वारे आर्थिक लुबाडणूक करण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. आर्थिक लुबाडणुकीसाठी वेगवेगळे मार्ग अवलंबणाऱ्या भामट्यांनी आता विद्युतबिल भरले नाही म्हणून रात्रीपर्यंत बिल न भरल्यास कनेक्शन तोडण्यात येईल, असा मेसेज पाठविला जात आहे. यामुळे अनेकांनी आपल्या खात्यातील रक्कम गमावल्याच्या तक्रारी हेस्कॉमकडे येऊ लागल्या आहेत. बँक खाते बंद पडले आहे, ते सुरू करण्यासाठी आलेला ओटीपी द्या, एटीएम कार्ड बंद पडणार आहे, त्यासाठी ओटीपी क्रमांकाद्वारे नोंदणी करा, तुम्हाला मोठे बक्षीस लागले असून त्यापूर्वी 5 ते 10 हजार रुपये दिलेल्या खात्यावर जमा करा, लष्करातील अधिकारी असल्याचे भासवून पैसे न देताच वस्तूंची अॅडव्हान्स ऑर्डर घेणे, यासह इतर फसवणुकीचे अनेक प्रकार आजवर घडले आहेत. यामुळे अनेकांच्या बँक खात्यातील लाखो रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली आहे. काहींनी याची रितसर तक्रार केली तर काहींनी आपल्या प्रतिष्ठेचा विचार करत तक्रार न देता गप्प राहणे पसंत केले. आता या भामट्यांनी सर्वसामान्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. विद्युतबिलाची रक्कम शिल्लक असून रात्रीपर्यंत पैसे न भरल्यास कनेक्शन बंद करण्यात येईल, असा मेसेज व्हॉट्सअॅपवर मागील काही दिवसांत अनेक ग्राहकांच्या मोबाईलवर आला आहे. काही ग्राहकांनी आलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता ती व्यक्ती उत्तर भारतातील असून हिंदी बोलत असल्याचे निदर्शनास आले. हेस्कॉम कार्यालयात जाऊ का? असे विचारले असता त्याऐवजी दिलेले अॅप्लिकेशन डाऊनलोड करून त्यावर पैसे भरण्याच्या सूचना केल्या आहेत.

बनावट मेसेजना बळी पडू नका...

बिल भरले नाही म्हणून कनेक्शन बंद करण्यात येईल, असा कोणत्याही प्रकारचा मेसेज हेस्कॉमकडून पाठविण्यात येत नाही. तसेच कोणत्याही थर्डपार्टी अॅप्लिकेशनवरून विजेचे बिल भरण्याऐवजी हेस्कॉमच्या अधिकृत वेबसाईट अथवा बिलभरणा केंद्रावरच बिल भरावे. नागरिकांना अनेक फसवे मेसेज पाठविले जात असून कोणीही त्या बनावट मेसेजना बळी पडू नये.

-संजीव हम्मण्णावर (साहाय्यक कार्यकारी अभियंते)

Advertisement
Advertisement
Tags :

.