नोकरी घोटाळाप्रकरणी एसआयटीची गरज नाही
पोलीस महासंचालक आलोक कुमार यांचे मत
प्रतिनिधी/ पणजी
सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना गंडविलेल्या ठकसेनांनी आतापर्यंत एकाही व्यक्तीला नोकरी मिळवून दिल्याचे पुरावे नाहीत. या सर्व प्रकरणांचा तपास पोलीस महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली योग्य दिशेने चालू आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सध्यातरी एसआयटी स्थापन करण्याची आवश्यकता नाही, असे मत पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी व्यक्त केले आहे.
शनिवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत उपमहासंचालक ओमवीर बिश्णोय, दक्षिण गोवा अधीक्षक सुनिता सावंत आणि उत्तर गोवा अधीक्षक अक्षत कौशल हे वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना आलोक कुमार यांनी या प्रकरणांचा कसून तपास व्हावा यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी सर्व प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगितले. अटक करण्यात आलेल्या एकाही आरोपीने अद्याप कुणालाही सरकारी नोकरी मिळवून दिल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही, असे ते पुढे म्हणाले.
‘सरकारी नोकरीसाठी पैसे’ घोटाळा प्रकरणात आतापर्यंत 29 एफआयआर नोंदवले असून दक्षिण गोव्यातून 20 तर उत्तर गोव्यातून 13 मिळून एकूण 33 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र आतापर्यंतच्या पोलीस तपासात कोणत्याही राजकीय व्यक्तीचा संबंध असल्याचे समोर आलेले नाही. त्याचबरोबर अटक केलेल्या एखाद्या आरोपींसोबत छायाचित्रात एखादा राजकारणी दिसणे हा पुरावा मानता येणार नाही, असे एका प्रश्नावर श्री. कुमार यांनी स्पष्ट केले. उलटपक्षी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळे अनेक पीडितांना तक्रारी करण्यासाठी पुढे येण्यास प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने ठकसेन पोलिसांच्या हाती लागले, असे ते पुढे म्हणाले.
दरम्यान, नोकरीसाठी पैसे घोटाळ्यात अटक झालेल्या ठकसेनांकडून अनेक इच्छुकांची कोट्यावधींची फसवणूक झाली आहे. त्यासंबंधी उत्तर गोव्यात 17 आणि दक्षिण गोव्यात 12 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात उत्तर गोव्यात डिचोलीत 5, आगशीत 4, पर्वरीत 2 तर जुने गोवे, म्हापसा आणि कोलवाळ येथे प्रत्येकी एक प्रकरणाचा समावेश आहे. तर दक्षिण गोव्यात म्हार्दोळ 2, फोंडा 3, काणकोण 2, वास्को 4 आणि मडगाव येथे एक प्रकरणांचा समावेश आहे.
या आरोपींकडून आतापर्यंत 166 ग्रॅम सोने, 2 मिनी बसेस आणि 12 चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. पुढील आर्थिक व्यवहार टाळण्यासाठी अनेकांची बँक खातीही गोठवण्यात आली आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये पैशाची देवाणघेवाण रोखीने झाली आहे. त्याशिवाय आरोपी आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संबंधितांची खाती गोठवण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत, अशी माहितीही यावेळी देण्यात आली