‘भुलभुलैया’ जॉब स्कॅममधील ठकसेनांच्या पोलीस कोठडीत वाढ
प्रतिनिधी/ फेंड़ा
बेरोजगारांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून 1.25 कोटी रुपयांना गंडविल्याप्रकरणी ढवळी-फोंडा येथील एका प्रतिष्ठित हायस्कूलचा शिक्षक योगेश य. शेणवी कुंकळकर (49, रा. ढवळी, भगवती मंदिराजवळ) याच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ, मास्टरमाईंड ठकसेन श्रृती प्रभुगावकर हिच्या पोलीस कोठडीत 6 दिवसांची वाढ तर 3.88 कोटी गंडविणाऱ्या दीपश्री सावंत गावस हिची रवानगी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. तिघांही संशयितांना फोंडा प्रथमवर्ग न्यायालयात काल शनिवारी हजर करण्यात आले होते.
याप्रकरणी फोंडा पोलीस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली फोंडा पोलीस व म्हार्दोळ पोलीस अधिक तपास करीत आहेत. कमिशन एजंट शिक्षक योगेश शेणवी कुंकळकर याने 1.25 कोटी रुपये ठकसेन श्रृती प्रभुगावकरला दिल्याची कबुली फोंडा पोलिसांना दिली तर संदीप परब याच्याकडून सुमारे 3.88 कोटीची रोख रक्कम दीपश्रीला सुपूर्द केल्याची जबानी दिली आहे. मात्र श्रृती प्रभुगावकर हिने योगेश याच्याकडून आपल्याला कोणतीच रक्कम मिळाली नसल्याचा कांगावा केला आहे. तिची नकारघंटा अजून कायम आहे. याप्रकरणी दोघेही कमिशन एजंट, ठकसेन महिला पोलीस कोठडीत आहेत. मात्र याप्रकरणातील ‘क्वीन पीन’ सुपरवुमन मोकाट असल्याचे बोलले जात आहे. पूजा नाईक प्रकरणातून भुलभुलैया जॉब स्कॅमची सुरुवात झाली, त्यानंतर दीपश्री सावंत गावस हिचे जॉब स्कॅम चर्चेत आले. शेवटी श्रृती अक्षय प्रभुगावकर हिचे प्रकरण उघडकीस आल्याने सर्व प्रकरणात सध्या महिला अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे.