रामा काणकोणकरच्या जबानीत जेनिटोचा कुठे उल्लेखच नाही!
पणजी : सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात जेनिटो कार्दोझचा उल्लेख केलेला नाही. तसेच, तो सत्य काय ते सांगणार असल्यामुळे जेनिटोने यापूर्वी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असल्याचा खळबळजनक दावा जेनिटोचे वकील मायकल नाझारेथ यांनी केला. काणकोणकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सराईत गुंड जेनिटो कार्दोझ याच्या जामीन अर्जावर शुक्रवारी 17 ऑक्टोबर रोजी न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी जेनिटोचे वकील मायकल नाझारेथ यांनी महत्त्वपूर्ण युक्तिवाद करताना न्यायालयासमोर मांडले की, मुख्य साक्षीदार रामा काणकोणकर यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात जेनिटो कार्दोझचा उल्लेख अथवा कोणताही संशयसुद्धा व्यक्त केलेला नाही.
ते म्हणाले, की आम्हाला हवे असते तर आम्ही जेनिटोचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता. पण तसे केले नाही, याचे कारण म्हणजे रामा सत्य तेच बोलणार, असा विश्वास होता. त्यामुळे रामा याची जबानी येईपर्यंत आम्ही वाट पाहणे पसंत करत आहोत. जेनिटोचा मारहाणीशी संबंध जोडला जाईल का, हे पाहण्यासाठी आम्ही कोणतेही विधान केले नाही. 18 सप्टेंबर रोजी करंझाळे येथे रामा काणकोणकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. याप्रकरणी पणजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून जेनिटो कार्दोझसह आठजणांना अटक केली होती. न्यायालयाने प्रथम सर्व संशयितांना पोलिस कोठडी ठोठावली, त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
रामाचा जेनिटोवर विश्वास नाही
जर जेनिटो निष्पाप आहे तर पुरावे नष्ट करण्याचा का प्रयत्न झाला, असा सवाल रामा काणकोणकर यांचे वकिल अॅड. शाना गोम्स यांनी केला. हे प्रकरण फक्त रामाच्या एकट्याच्या जबानीवर अवलंबून नाही, जेनिटोचे नाव तपासात वारंवार येत होते. त्याने याआधीच आपल्या मोबाईलमधला व्हॉट्सअप मेसेज आणि कॉल लॉग्स नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला जामिनावर सोडल्यास तो आणखी काही पुरावे नष्ट करेल, अथवा साक्षीदारांना धमकावण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
सक्तमजुरीच्या शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान
शिरदोण समुद्रकिनाऱ्यावर 10 मे 2009 रोजी झालेल्या झटापटीत संतोष कालेल आणि फ्रान्सिस मॅन्युएल डिसोझा ऊर्फ मिरांड यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सत्र न्यायालयाने जेनिटो कार्दोझसह सचिन पाडगावकर आणि प्रसाद कुबल या तिघांना सुनावलेली तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. या शिक्षेविरोधात जेनिटो कार्दोझने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.