For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आमच्यात वाद नाही, स्वभावदोष!

12:18 PM May 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
आमच्यात वाद नाही  स्वभावदोष
Advertisement

सभापती रमेश तवडकर यांचे प्रतिपादन : ’श्रमधाम’ची व्याप्ती राज्यभरात वाढविणार

Advertisement

पणजी : मंत्री गोविंद गावडे आणि आपणांमध्ये कोणताही वैयक्तिक वाद नाही. स्वत: आपण कधीच कोणत्याही वादात पडत नाही. तरीही जे काही झाले त्यास स्वभावदोष कारणीभूत असू शकतो. कोणाच्या मनात काय चालत आहे हे सांगणे कठीण असते. एखाद्या मुंगीवर एखाद्याचा पाय पडतो तेव्हा तिला आपण आता मरणार हे ठाऊक असते, तरीही शेवटची धडपड म्हणून ती त्या व्यक्तीचा चावा घेण्याचा प्रयत्न करतेच. आमच्यातील कथित वादाचेही असेच काहीसे आहे, असे वक्तव्य सभापती रमेश तवडकर यांनी केले. गुऊवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तवडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ’श्रमधाम’ योजनेच्या पुढील रोडमॅपच्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांनी तवडकर यांना मंत्री गावडेंशी ताणलेल्या संबंधाबाबत प्रश्न विचारला. त्यावर बोलताना तवडकर यांनी, आम्हा दोघांत वैयक्तीक कोणताही वाद नाही, असे सांगितले. काही दिवसांपूर्वी तवडकर यांनी याच योजनेतून प्रियोळ मतदारसंघातही काही घरे उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र त्या कार्यक्रमासाठी स्थानिक आमदार या नात्याने मंत्री गोविंद गावडे यांना निमंत्रित करणे क्रमप्राप्त होते. परंतु तवडकर यांनी त्यांना डावलून त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांना आमंत्रित केले. तेथूनच वादाची ठिणगी पडली. या प्रकारावर गावडे यांनी संताप व्यक्त करताना झाल्या प्रकाराबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावरही निशाणा साधला होता. तेवढ्यावरच न थांबता फोंडा येथे झालेल्या ’प्रेरणा दिन’ कार्यक्रमातही बोलताना मंत्री गावडे यांनी भाजप सरकारकडून आदिवासी समाजातील लोकांचा वापर केवळ राजकारण आणि मतांसाठी करण्यात येतो, असा आरोप केला होता.

श्रमधाम कार्यकर्त्यांचे उद्या काणकोणात अधिवेशन

Advertisement

दरम्यान, श्रमधाम योजनेंतर्गत आतापर्यंत हजारभर स्वयंसेवक नेंद झाले असून  त्या सर्वांना एका व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने उद्या दि. 1 जून रोजी काणकोण बसस्थानकावर खास अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून श्रमधाम योजनेचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्यभरात विस्तारित करण्याचा संकल्प जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती तवडकर यांनी दिली. कोणत्याही समाजातील एखादा मूळ गोमंतकीय जर खरोखरच घरापासून वंचित असेल किंवा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मोडकळीस आलेल्या घरात दिवस कंठित असेल तर त्या व्यक्तीला या योजनेंतर्गत पक्के घर बांधून देण्यात येणार आहे. त्याशिवाय एखाद्या नैसर्गिक आपत्तीत बेघर झालेल्यासह घर बांधून देण्यात येईल. ही घरे जास्तीत जास्त 80 चौ. मी. पर्यंतच्या क्षेत्रफळात बांधून देण्यात येतील व त्यासाठी प्रत्येकी 8 ते 14 लाखपर्यंत खर्च करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. या प्रकल्पासाठी राज्यभरातील दात्यांनी पुढे यावे, तसेच श्रमदान आणि समाजसेवेची आवड असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनीही पुढे यावे, त्यासाठी केवळ 1 ऊपया दान देऊन त्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन तवडकर यांनी केले. अशाप्रकारे आतापर्यंत सुमारे 1000 स्वयंसेवक नेंद केले आहेत, असे ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.