आरोग्य खात्यात भ्रष्टाचार करणाऱ्यांची गय नाही
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचा इशारा : सहा अधिकाऱ्यांची निलंबनाची प्रक्रिया सुरू,भ्रष्ट अधिकाऱ्यांवर होती खात्याची करडी नजर
पणजी : राज्याचे आरोग्य खाते हे थेट लोकांशी निगडीत आहे. लोकांचा या खात्यावर विश्वास आहे. लोकांना जर सेवाभावी कार्यात कुणी आरोग्य अधिकारी वा कर्मचारी कसूर सोडत असेल, तर त्याविऊद्ध निश्चितच कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय या खात्यात जर कुणी भ्रष्टाचार केल्याचे आढळले तर भ्रष्टाचार करणाऱ्यांची गय करणार नाही, असे सांगत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना गर्भित इशारा दिला आहे.
आरोग्य खात्यात भ्रष्टाचार केल्याचा तसेच लोकांना ब्लॅकमेल करून त्यांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवून दोन आरोग्य आणि चार स्वच्छता अशा मिळून सहा अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची प्रक्रिया आरोग्य खात्याने यापूर्वीच सुरू केली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर या अधिकाऱ्यांची नावे लवकरच उघड केली जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पत्रकारांना दिली.
मंत्री विश्वजित राणे म्हणाले, काही महिन्यांपासून आरोग्य खात्यातील काही अधिकारी लोकांची फसवणूक करीत आहेत. काहीजण तर भ्रष्टाचारामध्ये अडकलेले आहेत. लोकांच्या कमकुवत मानसिकतेचा फायदा घेऊन त्यांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार घडत आहेत. ह्या सर्व गोष्टी माझ्या कानावर आलेल्या आहेत. भ्रष्ट अधिकाऱ्यांचा शोध घेणे सुरू केले आहे. खात्यामार्फत या अधिकाऱ्यांची चौकशी लवकरच करण्यात येणार आहे. आरोग्य विभागात कार्यरत दोन आणि स्वच्छता विभागात कार्यरत असलेले चार असे मिळून एकूण सहा अधिकारी भ्रष्टाचारात गुंतल्याचा संशय आहे. या सर्वांवर लवकरच निलंबनाची वेळ येणार आहे. कारण या भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांविऊद्ध कारवाईची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.
दरम्यान, आरोग्य खात्यात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये, खात्याचा कारभार पारदर्शी व्हावा, यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे पूर्णपणे प्रयत्न करीत आहेत. तरीही काही अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार करण्याचे प्रकार घडत आहेत. काही अधिकारी उपचारांसाठी येणाऱ्या नागरिकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे प्रकार घडत असल्याचे लोकांकडून सांगण्यात आल्यानंतर या भ्रष्टाचारात गुंतलेल्यांवर करडी नजर ठेवण्यात आली होती. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या दोन आणि स्वच्छता विभागाच्या चार अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवल्याने त्यांना सेवेतून निलंबित करण्याची प्रक्रिया खात्याने सुरू केली आहे, असे आरोग्यमंत्री राणे म्हणाले.