डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत कदापि तडजोड नाही
आरोग्यमंत्री विश्वजित राणे बनले आग्रही : ‘गार्ड’चे शिष्टमंडळ भेटले आरोग्यमंत्र्यांना
पणजी : डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत सरकार कोणतीही तडजोड करणार नाही. गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) आणि राज्यातील अन्य इस्पितळांतील महिला डॉक्टरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी येत्या दोन दिवसात महिला डॉक्टरची नियुक्ती केली जाईल, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले. तसेच रहिवासी डॉक्टरांसाठी देखील एक डॉक्टर नियुक्त करण्यात येणार आहे, असेही आरोग्यमंत्री म्हणाले. पणजीत काल मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत गोमेकॉचे डिन शिवानंद बांदेकर तसेच गार्ड संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
गार्ड संघटनेच्या सर्व मागण्यांवर विचार
गोमेकॉ परिसरातील सुरक्षेबाबत गोवा असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (गार्ड) संघटनेच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यात येतील. याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गार्डकडून आरोग्यमंत्र्यांना निवेदन सादर
‘गार्ड’च्या शिष्टमंडळाने आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. त्यात प्रामुख्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या डॉक्टरसाठी स्वतंत्र सुरक्षारक्षक नेमणे, अंधारी भागात पथदिवे लावणे, ऊग्णांना भेटण्यास आलेल्या व्यक्तींना वेगळा पास पुरवणे, डॉक्टरांच्या कामकाजाची माहिती संगणीकृत करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.
मंत्रिमंडळात सविस्तर विषय मांडणार
गार्डच्या मागण्या पूर्ण करण्याचे लेखी हमीपत्र आपण संघटनेला देणार आहे. महिलांचे सशक्तीकरणाच्या गोष्टी आम्ही करतो तेव्हा महिला डॉक्टरांना संरक्षण देणे आमचे कर्तव्य आहे. शिवाय आमचे डॉक्टर गावागावात जातात त्यांनाही संरक्षण द्यावे लागेल. आपण हा विषय सविस्तरपणे मंत्रिमंडळात मांडणार असेही आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.
कोलकातासारखी परिस्थिती उद्भवू नये
महिला व बालकल्याणमंत्री या नात्याने महिलांची सुरक्षितता ही आपली देखील जबाबदारी आहे. राज्यातील महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेला आम्ही प्राधान्य देत आहोत. डॉक्टरांच्या सुरक्षिततेबाबत असणाऱ्या कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल. गोमेकॉतील आंदोलनकर्त्या डॉक्टरांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. कोलकातासारखी परिस्थिती गोव्यात उद्भवू नये, यासाठी आम्ही सर्व ते उपाय करणार आहोत. गार्ड संघटनेच्या शिष्टमंडळाने पत्रकारांना सांगितले की, आरोग्यमंत्री राणे आमच्या मागण्या पूर्ण करतील असा आम्हाला विश्वास आहे. गोमेकॉमध्ये सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले आहे. आम्ही जरी आंदोलन मागे घेतले तरी विविध मार्गाने निषेध व्यक्त करत राहणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
भ्रष्टाचार कदापि खपवून घेणार नाही
आपल्याकडे असलेल्या कोणत्याही खात्यात जर भ्रष्टाचार आढळून आला तर गय केली जात नाही. बेतकी येथे अलीकडेच एका डॉक्टराची सेवा बडतर्फे केली आहे. तसेच नगर नियोजन खात्यातही भ्रष्ट कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांना क्षमा नाही, असेही विश्वजित राणे म्हणाले.