खोल समुद्रात आहे विषारी तलाव
तलावात पोहोचल्यावर होतो त्वरित मृत्यू
वैज्ञानिकांनी लाल समुद्रात एका विशाल आकाराच्या जीवघेण्या तलावाचा शोध घेतला आहे. या तलावात पोहणारा इसम त्वरित मृत्युमुखी पडतो किंवा बेशुद्ध होत असतो. युनिव्हर्सिटी ऑफ मियामीच्या टीमचे सदस्य प्राध्यापक सीम पुरकिस यांनी या तलावामागील रहस्य उघड केले आहे. हा तलाव पूर्णपणे ऑक्सिजनरहित आहे. आणि यात घातक पातळीवरील खारेपणा आहे. याचमुळे तलावात जाणारा जीव त्वरित मृत्युमुखी पडतो किंवा बेशुद्ध होत असल्याचे पुरकिस म्हणाले.
हा तलाव खोल समुदात असून तो अनेक सागरी जीवांसाठी ‘मृत्यूचा सापळा’च आहे. या तलावात प्राण्यांची त्वचा दीर्घकाळापर्यंत पूर्वीसारखीच राहते. संशोधकांना या तलावात एक खेकडा मिळाला होता, जो आठ वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडला होता, परंतु त्याची त्वचा पूर्वीसारखीच होती. केवळ ऑक्सिजनचा अभाव आणि घातक स्तरावरील खारेपणाच या तलावाला जीवघेणे स्वरुप देत नाही, तर यात अनेक विषारी रसायने देखील आहेत, यात हायड्रोजन सल्फाइडचाही समावेश आहे.
या शोधामुळे वैज्ञानिकांना आमच्या ग्रहावर महासागराची निर्मिती कशी झाली हे जाणून घेण्यास मदत होणार आहे. प्रतिकूल स्थितीत राहणाऱया सूक्ष्मजीवांचा शोध आमच्या पृथ्वीवर जीवनाच्या मर्यादांचा शोध लावण्यास मदत करू शकतो आणि आमच्या सौरमंडळात आणि त्या बाहेर जीवसृष्टीचा शोध लावण्यास याचा वापर केला जाऊ शकतो. पृथ्वीवरील जीवसृष्टीवरील मर्यादा समजून घेतल्यास दुसऱया ग्रहावर एखादा प्राणी जिवंत राहू शकतो का हे जाणून घेता येणार असल्याचे प्राध्यापक पुरकिस यांनी म्हटले आहे.
ब्राइन पूल सर्वसाधारणपणे समुद्राच्या तळाला आढळून येतात, तेथे जीवन नसते. परंतु हे तलाव काही सूक्ष्मजीवांचे घर असते. काही जीव ब्राइन पूलाचा वापर जीवनासाठी करतात. मसल्स हे पूलमध्ये आढळून येणाऱया मिथेनचा वापर करतात आणि त्याला कार्बन शूगरमध्ये रुपांतरित करतात. पुरकिस यांच्या टीमने रिमोट अंडरवॉटर व्हेइकलचा वापर करत 1770 मीटर खोलीवर या तलावाचा शोध लावला आहे.