या गावात आहे जिवंत ममी
बौद्ध लामाची ममी, नखं, केस वाढल्याचा दावा
भारताचा इतिहास इतका मोठा आहे की तो वाचण्यास एखाद्याचे आयुष्यच अपुरे पडेल. याच इतिहासातून अनेक प्रकारच्या कहाण्या देखील समोर येतात. यातील काही कहाण्यांवर विश्वास ठेवणे काहीसे अवघड असते. भारत-चीन सीमेनजीक स्पीतितील एका गावात बौद्ध लामाची ममी शेकडो वर्षांपासून जिवंत असल्याचा दावा करण्यात येतो. या ममीची नखं आणि केस वाढत असल्याचे बोलले जाते.
लाहौर स्पीति या जिह्यातील गयू गावात 550 वर्षे जुन्या बौद्ध लामाची ममी आहे. या ममीचे केस आणि नखं आजही वाढत असल्याचे मानले जाते. समाधीत लीन ममीबद्दल आता रहस्य निर्माण झाले आहे. हिमाचल प्रदेशातील स्पीति खोऱ्याच्या थंड वाळवंटात एक ऐतिहासिक गाव वसलेले आहे. हे गाव समुद्रसपाटीपासून सुमारे 10,499 फुटांच्या उंचीवर आहे. ग्यू गाव भारत-चीन सीमेच्या नजीक आहे. परंतु या गावात 500 वर्षे जुन्या ममीला पाहण्यासाठी जगभरातून लोक येत असतात.
कुणाची आहे ही ममी?
लाहौर स्पीति खोऱ्यातील ऐतिहासिक ताबो मठापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेले ग्यू गाव वर्षातील 6-8 महिने हिमवृष्टीमुळे जगाच्या संपर्कापासून तुटलेले असते. येथील लोक या ममीला देव मानून पूजा करतात. ही ममी तिबेटमधून ग्यू गावात येत तपस्या करणाऱ्या लामा सांगला तेनजिंग यांची असल्याचे सांगण्यात येते. तेनजिंग यांचा मृत्यू वयाच्या 45 व्या वर्षी झाला होता. भारत-तिबेट सीमा पोलिसांना रस्ते निर्मितीच्या कार्यादरम्यान ही ममी मिळाली होती.
आणखी एक दावा
1975 मध्ये येथे झालेल्या भूकंपात ही ममी जमीनदोस्त झाली होती. 1995 मध्ये आयटीबीपीच्या जवानांना रस्त्यासाठीच्या कामादरम्यान ही ममी मिळाली होती. खोदकामावेळी या ममीच्या शिरावर कुदळ लागल्याने रक्तही वाहू लागले होते असे बोलले जाते. ममीवरील याच्या खुणा आजही दिसून येतात. 2009 पर्यंत ही ममी आयटीबीपीच्या तळावर ठेवण्यात आली होती. नंतर ही ममी ग्यू गावात स्थापित करण्यात आली. नैसर्गिक स्वरुपात संरक्षित आता या ममीला काचेच्या पेटीत संरक्षित करण्यात आले आहे.