For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ईश्वराचे अवतार दोन प्रकारचे असतात

06:57 AM Sep 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
ईश्वराचे अवतार दोन प्रकारचे असतात
Advertisement

अध्याय तिसरा

Advertisement

बाप्पा वरेण्याला म्हणाले, पूर्वी माझे अनेक जन्म झालेले आहेत आणि मला ते आठवत आहेत. ह्याचे कारण म्हणजे कोणत्याही जन्मात मी केलेले कार्य निरपेक्षतेने केलेले असल्याने अपेक्षांचे ओझे माझ्या मनावर नसते. त्यामुळे माझ्या स्वच्छ मनात पूर्वीच्या जन्मांचे स्मरण राहते. विष्णु आदिकरून देवही माझ्यापासून उत्पन्न झाले आणि प्रलयकाली माझ्यामध्येच ते लय पावतात. जन्मरहित, नाशरहित, सर्व भूतांचा आत्मा आणि अनादि कालापासून ईश्वर असा मी आहे. त्रिगुणात्मक मायेचा आश्रय करून नानाप्रकारच्या योनींचे ठिकाणी मी जन्म घेतो. पृथ्वीवरील सर्व प्राणी अज्ञात स्थळी असतात. तेथून ते काही काळ येथे येऊन व्यक्त होतात आणि त्यांचा येथील कार्यकाळ संपला की पुन्हा अज्ञात स्थळी रवाना होतात. मी मात्र कायम व्यक्त असतो. हेच माझे वैशिष्ट्या आहे. काही विशिष्ट कार्यासाठी माझा अवतार होत असतो. बाप्पा कोणत्या कारणासाठी अवतार घेतात ते पुढील श्लोकात सांगतायत. अर्थात गीतेत भगवंतांनी सांगितलेलं आणि हे कारण एकच आहे.

अधर्मोपचयो धर्मापचयो हि यदा भवेत् ।

Advertisement

साधून्संरक्षितुं दुष्टांस्ताडितुं संभवाम्यहम् ।। 10 ।।

अर्थ-अधर्माचा उत्कर्ष व धर्माचा अपकर्ष जेव्हा होतो तेंव्हा साधूचे संरक्षण करण्याकरिता आणि दुष्टांना शासन करण्याकरिता मी जन्म घेत असतो.

विवरण-अधर्माचा उत्कर्ष व धर्माचा अपकर्ष जेव्हा होतो तेंव्हा साधूचे संरक्षण करण्याकरिता आणि दुष्टांना शासन करण्याकरिता बाप्पा जन्म घेत असतात. जेव्हा मनुष्याच्या अपेक्षा वाढू लागतात तेव्हा त्याची हाव वाढू लागते. त्यातून अनेक प्रकारची सकाम कर्मे उदयाला येतात. दुष्टांना विश्वावर ताबा मिळवायचा असतो त्याहेतून ते अमर होण्यासाठी तप करून देवाला प्रसन्न करून घेतात आणि त्याच्याकडून त्यांना हवे असलेले वरदान मिळवतात. ते प्राप्त झाले की, त्यांचे दु:साहस आणखीनच वाढते आणि ते मिळालेल्या वरदानाचा उपयोग सज्जन लोकांना त्रास देण्यासाठी करू लागतात. त्यामुळे त्याच्या हातून निषिद्ध आचरण आदि गोष्टी सहजी घडू लागतात. फाजील आत्मविश्वासाने अधर्म फोफावतो. या सगळ्याचा निष्काम कर्म करणाऱ्या संत महात्म्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ लागतो. त्यांचे रक्षण करण्यासाठी व अधर्म, अन्याय आणि पाप नष्ट करण्यासाठी ईश्वरी अवतार होत असतो.

ईश्वराचे अवतार अवरोहात्मक व आरोहात्मक अशा दोन स्वरूपाचे असतात. पहिल्या अवरोहात्मक स्वरूपात ईश्वर स्वत: मनुष्यदेह धारण करतात तर दुसऱ्या स्वरूपात ज्या मनुष्याची ईश्वरस्वरूपात उक्रांती झालेली असते, तो ईश्वरी अवतार भासू लागतो. असा मनुष्य त्याच्या जीवित काळात सतत लोकहितार्थ कार्य करून त्यांचं कल्याण कसं होईल हे पहात असतो. त्यांना परमार्थाचा राजमार्ग दाखवत असतो.

वर सांगितल्याप्रमाणे ईश्वराच्या प्रिय भक्ताला होणारा त्रास दूर करून धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी ईश्वरी अवतार होत असतात पण त्याचबरोबर अवतारकाळात जे पुण्यवान आहेत, पात्र आहेत अशा अनेकांची ईश्वर दर्शनाची मनोकामनाही पूर्ण होते. त्यांना प्रत्यक्ष ईश्वराचा सहवास लाभतो. बाप्पांचेही प्रत्येक युगात अवतार झाले आहेत. कृतयुगात कश्यपपुत्र विनायक, त्रेतायुगात मोरेश्वर, द्वापार युगात गजानन तर कलियुगात धुम्रवर्ण असे ते अवतार होत. पुढील श्लोकातून अवतारकार्याचे सविस्तर विवेचन बाप्पा करत आहेत.

उच्छिद्याधर्मनिचयं धर्मं संस्थापयामि च ।

हन्मि दुष्टांश्च दैत्यांश्च नानालीलाकरो मुदा ।। 11।।

अर्थ-अधर्मसंग्रहाचा उच्छेद करून मी धर्माची संस्थापना करतो. नानाप्रकारच्या लीला करून हसत खेळत दुष्टांचा व दैत्यांचा संहार करतो.

क्रमश:

Advertisement
Tags :

.