आंबोलीतील बरेचसे धबधबे अजून कोरडेच
सावंतवाडी
जून महिन्याचा पंधरवडा उलटला की, आंबोलीतील धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक आंबोलीकडे कुच करतात. मात्र जून महिन्याची 20 तारीख उजाडली तरी अजून आंबोलीतील मुख्य धबधब्यांवर पाणी नसल्यामुळे त्या ठिकाणी वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे.
पाऊस नसल्यामुळे आंबोलीतील बरेचसे धबधबे अजून कोरडेच आहेत. येथील निसर्ग सौंदर्यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या आंबोलीत पाऊस सुरू झाला की धबधबे प्रवाहित होत असतात. मात्र , यावर्षी अर्धा जून महिना उलटला तरी धबधबे प्रवाहित न झाल्याने पर्यटक मात्र नाराज आहेत. एवढ्या लांबून प्रवास करून पर्यटक दाखल होत असतात मात्र कोरड्या धबधब्यांमुळे त्यांची फेरी फुकट जातेय अशी भावना येथील पर्यटक व्यक्त करीत आहेत. दरवर्षी जून महिन्यातच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह गोवा , कर्नाटक येथील पर्यटक आंबोलीत दाखल होतात. मुख्य धबधब्याच्या परिसरात असलेल्या पर्यटन व्यवसायिकांना यामुळे रोजगार मिळत असतो. मुख्य धबधब्याच्या ठिकाणी अनेक स्टॉल्स असून या स्टॉल्सवर पर्यटक चहा, भजीचा आस्वाद घेत असतात. मात्र सिंधुदुर्गात पावसाने म्हणावी तशी ओढ घेतली नसल्याने धबधबे अजूनही कोरडेच पाहायला मिळतात. येथील पर्यटन व्यवसायिकांचे तसेच पर्यटकांचे आंबोलीतील धबधबे कधी प्रवाहित होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.