सिद्धरामय्या सरकारमध्ये कोणत्याही समस्या नाहीत
हल्याळ, जोयडाचे आमदार आर. व्ही. देशपांडे यांचा दावा
कारवार : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्या नाहीत, तथापि काही आमदारांकडून विकासकामे संथगतीने होत आहेत, त्याबद्दल नाराजी आहे, असा दावा प्रशासन सुधारणा आयोगाचे अध्यक्ष आणि हल्याळ, जोयडाचे आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी केला. ते सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, काही आमदारांनी मंत्री किंवा अध्यक्ष होण्याची आकांक्षा बाळगली असावी. असे आमदार प्रसिद्धी माध्यमांकडे गेले असता त्यांना हेडलाईन मिळते, असे सांगून देशपांडे पुढे म्हणाले, सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारला हायकमांडचा पूर्ण पाठिंबा आहे.एखाद्या आमदाराला कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास अशा आमदारांनी राज्य काँग्रेस प्रभारी सुरजेवाला यांच्याशी संपर्क साधून किंवा भेट घेऊन समस्येवर तोडगा काढावा, असा सल्ला दिला.
2013-18 मध्ये राज्याचे नेतृत्व करणाऱ्या सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वामध्ये आणि आताच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये ती धार दिसून येत नाही, असा प्रश्न उपस्थित केला असता देशपांडे म्हणाले, त्या अवधीतील सारखेच राहणे सिद्धरामय्या यांना कसे शक्य आहे? असा प्रश्न उपस्थित करून मी स्वत: देशपांडे पूर्वीचा सारखा राहिलेलो नाही. सिद्धरामय्या यांनी चांगले निर्णय घेतले आहेत. प्रशासन करताना सर्व काही थेटपणे सांगून करणे शक्य नाही. आपल्यापेक्षा सिद्धरामय्या यांची सहनशीलता अधिक आहे. सिद्धरामय्या हेच पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार आहेत. याबद्दल दुमत नाही. मुख्यमंत्री बदलाबद्दल कुठेही चर्चा झालेली नाही. काँग्रेसचे सर्व आमदार एकजुटीने कार्य करीत आहेत.
गॅरंटीवर 58 हजार कोटी खर्च
राज्यात काँग्रेस सरकारने पाच गॅरंटीवर 58 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. प्रत्येक आमदाराला 50 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तथापि, निधी मंजूर करताना आणि विकासकामे सुरू करताना थोडा विलंब झाला आहे. हा विलंब पूर्वीही होता, आताही त्यामध्ये थोडी भर पडली आहे. केपीसीसी अध्यक्ष बदलाबद्दल आपणाला काही माहिती नाही. मंत्री सतीश जारकीहोळी ही एक चांगली व्यक्ती आहे. ते अध्यक्ष होणार की नाही याबद्दल त्यांनी निर्णय घ्यायचा असे पुढे देशपांडे यांनी स्पष्ट केले.
सी-बर्ड प्रकल्प कंपाऊंड वॉलवरून देशपांडे संतप्त
सोमवारी येथील जिल्हा पंचायतीच्या केडीपी बैठकीत येथून जवळच्या सी-बर्ड प्रकल्पाच्या कंपाऊंड वॉलवरून माजी मंत्री देशपांडे भलतेच संतप्त झाले. कंपाऊंड वॉलमुळे प्रकल्पाच्या परिसरातील जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येचे निरसन करण्याच्या बाबतीत अधिकारी उदासीन आहेत. मुसळधार पावसाच्यावेळी पाण्याचा योग्य तो निचरा होत नसल्यामुळे जनतेला गेल्या अनेक वर्षांपासून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कारवार आणि अंकोला तालुक्यातील हजारो कुटुंबीयांच्या त्यागामुळे सी-बर्ड प्रकल्प आकार घेत आहे. जिल्हा पोलीसप्रमुखांनी सी-बर्ड प्रकल्प अधिकाऱ्यांशी समन्वय साधून पाणी साचण्याच्या समस्येवर तोडगा काढण्याची सूचना देशपांडे यांनी केली.