For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुस्तीच्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धांत सुवर्ण वा कांस्यसाठी लढती नाहीत

06:34 AM Nov 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
कुस्तीच्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धांत सुवर्ण वा कांस्यसाठी लढती नाहीत
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पुढील वर्षीच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान बहाल करणाऱ्या कुस्तीच्या खंडिय पात्रता स्पर्धेत सुवर्ण किंवा कांस्यपदकांसाठीच्या लढती होणार नाहीत आणि उपांत्य फेरीतील दोन्ही लढतींतील विजेते 2024 च्या क्रीडास्पर्धेसाठी पात्र ठरतील, असे जागतिक प्रशासकीय संस्था ‘यूडब्ल्यूडब्ल्यू’च्या नवीन पद्धतीने स्पष्ट केले आहे.

चार खंडिय पात्रता स्पर्धांच्या व्यतिरिक्त जागतिक पात्रता स्पर्धेत सुद्धा सुवर्णपदक मिळणार नाही आणि उपांत्य फेरीतील दोन विजेत्यांना ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळेल, तर कांस्यपदकांच्या लढतीतील विजेते तिसऱ्या स्थानासाठी तीन शैलींच्या प्रत्येकी सहा वजनी गटांत शर्यतीत उतरतील.

Advertisement

अकापुल्को, मेक्सिको येथे 28 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान होणार असलेल्या पॅन-अमेरिकन स्पर्धेने पात्रता संधी खुल्या होतील. ‘पुढील वर्षीच्या सर्व पाच पॅरिस ऑलिम्पिक पात्रता स्पर्धांत प्रत्येक वजन गटात चार सिड्स असतील आणि सुवर्णपदकासाठीच्या लढती होणार नाहीत’, असे संस्थेने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे. आफ्रिकी आणि ओशनिया पात्रता स्पर्धा 22 ते 24 मार्च दरम्यान अलेक्झांड्रिया, इजिप्त येथे, तर युरोपियन पात्रता स्पर्धा बाकू, अझरबैजान येथे 4 ते 7 एप्रिल दरम्यान होणार आहे. आशियाई पात्रता स्पर्धा 19 ते 21 एप्रिल दरम्यान बिश्केक, किर्गिस्तान येथे, तर जागतिक ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा 9 ते 12 मेदरम्यान इस्तांबूल, तुर्किये येथे होणार आहे.

या वर्षी सप्टेंबरमध्ये बेलग्रेड, सर्बिया येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत तीन शैलींच्या सहा वजनी गटांमधून प्रत्येकी पाच स्थाने बहाल करण्यात आली होती आणि प्रतिभावान अंतिम पांघल हा त्यात कांस्यपदक जिंकून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला एकमेव भारतीय कुस्तीपटू राहिला होता.

Advertisement
Tags :

.