For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चेन्नईत भारतीय संघाच्या सरावास सुरुवात

06:58 AM Sep 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
चेन्नईत भारतीय संघाच्या सरावास सुरुवात
Advertisement

19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध होणार पहिली कसोटी, प्रशिक्षक गौतम गंभीर व त्यांचा स्टाफ यांची पहिली कसोटी मालिका

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

महिनाभराच्या ब्रेकनंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पुन्हा तयारीला लागला असून बांगलादेशविरुद्ध येथे होणाऱ्या कसोटीसाठी प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीर व त्यांचा साहायक स्टाफ यांच्या देखेरेखीखाली सरावाला सुरुवात केली आहे.

Advertisement

19 सप्टेंबरपासून पहिली कसोटी सुरू होणार असून यासाठी रोहित शर्मा व विराट कोहलीसह संपूर्ण संघ येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर एकत्र आला आहे. नवे गोलंदाज प्रशिक्षक दक्षिण आफ्रिकेचे मॉर्नी मॉर्कल व साहायक प्रशिक्षक अभिषेक नायर हेही उपस्थित आहेत. सरावाच्या पहिल्या दिवसाची काही छायाचित्रे बीसीसीआयने पोस्ट करीत, ‘होम सीजनसाठी टीम इंडियाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून सरावाला सुरुवात झाली आहे,’ असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.  संपूर्ण संघ प्रशिक्षक गंभीर, साहायक स्टाफ व कर्णधार रोहित यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत असल्याचे छायाचित्रात दिसत आहे.

तत्पूर्वी, कर्णधार रोहित शर्माचे गुरुवारी चेन्नईत आगमन झाले तर विराट कोहली लंडनहून थेट चेन्नईत दाखल झाला. पिवळी जर्सी घातलेला रोहित शर्मा विमानतळामधून बाहेर पडताना दिसला. कोहली मात्र गुरुवारी सकाळी लवकर दाखल झाला होता. जसप्रित बुमराहृ केएल राहुल, यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत हेही गुरुवारी लवकर चेन्नईत दाखल झाले.

महिन्याहून अधिक दिवसांचा ब्रेक घेतल्यानंतर भारतीय खेळाडू प्रथमच मैदानात  उतरले असून गेल्या ऑगस्टमध्ये लंकेविरुद्ध वनडे मालिकेत झालेल्या पराभवाची निराशा मागे सारत गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा विजयी मार्गावर येण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. गंभीर व त्यांचे साहायक स्टाफ यांच्या मार्गदर्शनाखाली होणारी ही पहिली कसोटी मालिका आहे. पाकिस्तानविरुद्ध 2-0 असा ऐतिहासिक मालिकाविजय मिळविल्यानंतर आत्मविश्वास प्रचंड दुणावलेल्या बांगलादेशविरुद्ध रोहितचा संघ कसा सामोरे जातो, ते पाहणे मनोरंजक ठरेल.

भारताचा या मोसमात भरगच्च कार्यक्रम असून एकूण 10 कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी गुण महत्त्वाचे ठरणार आहेत. भारतीय संघ या चॅम्पियनशिपमधील आपले स्थान आणखी मजबूत करण्यासाठी दोन सामन्यांची ही मालिका जिंकण्यासाठीच प्रयत्न करेल. भारताची न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात तीन सामन्यांची मालिका झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच देशात पाच कसोटींची बॉर्डर-गावसकर करंडक मालिका होणार आहे. भारत व बांगलादेश यांच्यातील दुसरी कसोटी कानपूरमध्ये 27 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

डब्ल्यूटीसी क्रमवारीत भारतीय संघ 68.52 टक्के गुणांसह अग्रस्थानावर आहे तर ऑस्ट्रेलिया 62.50 टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशने 45.83 टक्के गुणांसह चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. पाकविरुद्ध मिळविलेल्या मालिकाविजयाचा त्यांना मोठा लाभ झाला आहे. पहिली कसोटी त्यांनी 10 गड्यांनी जिंकल्यानंतर दुसऱ्या कसोटीत लिटन दासने शानदार शतक नोंदवत एकहाती बांगलादेशला विजय मिळवून दिला होता.

Advertisement
Tags :

.