...तर उत्तर कर्नाटकाचे वाळवंट होईल!
म्हादईबाबत कॅ. नितीन धोंड यांचे प्रतिपादन
धारवाड : म्हादई नदी ही पश्चिम घाटातील नैसर्गिक जलप्रवाह व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. या नदीचे पाणी किंवा पात्र वळविल्यास उत्तर कर्नाटकाचे रुपांतर रखरखीत वाळवंटात होईल, असे अभ्यासपूर्ण प्रतिपादन ‘परिसारकागी नावू’ या संस्थेच्या बेळगाव शाखेचे कार्यकर्ते कॅप्टन नितीन धोंड यांनी केले. धारवाड येथे कर्नाटक विद्यावर्धक संघाच्यावतीने धारवाड येथे 8 आणि 9 सप्टेंबरला आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे विचार व्यक्त केले. त्यांनी आपल्या सादरीकरणात खानापूर तालुक्यातून वाहणाऱ्या मलप्रभा नदीची पर्यावरणीय स्थिती स्पष्ट केली. खानापूर तालुक्यातील घनदाट वनांमुळे येथे प्रत्येक वर्षी मोठा पाऊस पडतो आणि त्यामुळे मलप्रभा नदीला पाणी मिळते. हेच पाणी पुढे अन्य नद्यांना मिळते. त्यामुळे उत्तर कर्नाटकाच्या पाण्याची सोय होते. या भागाच्या प्रगतीत या पाण्याचे मोठे योगदान आहे.
खानापूरचा वनभाग हा म्हादई आणि मलप्रभा या दोन मुख्य नदी व्यवस्थांचा मूलस्रोत आहे. मात्र, आज या भागांमध्ये वारेमाप वृक्षतोड होत आहे. अशास्त्रीय पद्धतीने पायाभूत सुविधा प्रकल्प निर्माण पेले जात आहेत. शेतजमिनींचे औद्योगिक जमिनीमध्ये रुपांतर केले जात आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होत असून नद्यांना होणारा पाणीपुरवठाही कमी होत आहे. याचा परिणाम उत्तर कर्नाटकातील पर्यावरणीय स्थितीवर होत असून पर्यावरणाचा हा ऱ्हास न रोखल्यास उत्तर कर्नाटकाचे वाळवंटात रुपांतर होऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. म्हादई नदीचे पाणी वळविण्याच्या प्रकल्पामुळे मोठा गंभीर परिणाम उत्तर कर्नाटकाच्या जलस्रोत व्यवस्थेवर होऊ शकतो, असेही महत्त्वपूर्ण प्रतिपादन कॅप्टन धोंड यांनी या कार्यक्रमात केले.
पूर्णिमा गौरोजी यांचे प्रयत्न
मलप्रभा नदीच्या तिरावरील बेकायदेशीर बांधकामे हटविण्याचा लढा पूर्णिमा गौरोजी 2003 पासून नेटाने लढत आहेत. अनेक प्रकरणे न्यायालयात पोहोचली असून रामदुर्ग येथे या नदीचे पात्र वाचविण्यासाठी त्या शक्य तितके सर्व प्रयत्न करीत आहेत. कोणत्याही अडथळ्यांविना वाहण्याचा या नदीला अधिकार आहे, तसेच या नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये, हा लोकांचा अधिकार आहे. या अधिकारांसाठी त्या लढा देत आहेत, अशी माहितीही या कार्यक्रमात देण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला धर्मगुरु, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, साहित्यिक, विचारवंत, पर्यावरणतज्ञ, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचीही उपस्थिती मोठ्या संख्येने होती. बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व पर्यावरणी परिवर्तन जागृती महिलेयार वक्कुटा, ले. ज. सरदेशपांडे मेमोरियल सह्याद्री कॉन्झर्व्हेशन इंटरप्रिटेशन सेंटर, ग्राकूज आणि परिसरक्कागी नावू आदी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी केले. चिपको आंदोलनाची 50 वर्षे आणि अप्पिको आंदोलनाची 40 वर्षे साजरी करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सेव्ह वेस्टर्न घाट्स अभियान, परिसरक्कागी नावू धारवाड शाखा आणि विद्यावर्धक संघ, धारवाड हे या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते. कप्पडागुड्डाचे नंदीवेरी शिवकुमार स्वामीजी यांची विशेष उपस्थिती होती.