शहरात लक्ष्मीपूजन भक्तिभावाने
दिव्यांचा लखलखाट : सर्वत्र उत्साह : सायंकाळनंतर लक्ष्मीपूजनाची धामधूम
प्रतिनिधी/ बेळगाव
शहर परिसरात शुक्रवारी सायंकाळनंतर लक्ष्मीपूजनाची धामधूम सर्वत्र पाहावयास मिळाली. बाजारपेठेत लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत व्यापारी आणि व्यावसायिकांनी पूजन केले. दिव्यांचा लखलखाट आणि चैतन्यमय वातावरणात लक्ष्मीपूजनाचा विधी झाला.
बाजारात सकाळपासूनच लक्ष्मीपूजनाच्या तयारीसाठी व्यापारी, व्यावसायिक व लहान विक्रेत्यांची धडपड सुरू होती. गणपत गल्ली, खडेबाजार, पांगुळ गल्ली, मेणसी गल्ली, किर्लोस्कर रोड, काकतीवेस रोड, समादेवी गल्ली, खडेबाजार आदी ठिकाणी दुकानांमध्ये लक्ष्मीपूजन उत्साहात झाले. लक्ष्मीपूजनामुळे पूजेचे साहित्य हार, फुले, तोरण, अंबोती, ऊस, केळीची झाडे आदींची लगबगही पहावयास मिळाली.
दिव्यांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळीला वसुबारसपासून प्रारंभ झाला आहे. सोमवारी वसुबारस, मंगळवारी धनत्रयोदशी, गुरुवारी नरक चतुर्दशी तर शुक्रवारी लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम झाला. मागील चार दिवसांपासून दिवाळीच्या खरेदीची गर्दी होत आहे. रांगोळी, पूजेचे साहित्य, आकाशकंदील, दिवे, पणत्या आणि इतर साहित्याची खरेदी वाढली आहे.
झेंडू, ऊस, केळीच्या झाडांची आवक
लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर शहरात झेंडू, ऊस आणि केळीच्या झाडांची आवक वाढली होती. सर्वच व्यापारी, उद्योगधंदे आणि इतर लहान-सहान व्यावसायिकांकडून लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधला जातो. या पार्श्वभूमीवर मागणीही वाढली होती.
आज नवीन वस्तू खरेदीला उधाण
साडेतीन मुहुर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या दिवाळी पाडव्याच्या शुभमुहुर्तावर शनिवारी मोठ्या प्रमाणात नवीन वस्तूंची खरेदी होणार आहे. सोने-चांदी, कपडे, वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे शनिवारी ज्वेलरी दुकाने आणि शोरूम्समध्ये नागरिकांची गर्दीही पहावयास मिळणार आहे. त्यामुळे आर्थिक उलाढाल वाढणार आहे.