कित्तूर किल्ल्यात थीम पार्क
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : 30 कोटी खर्चास प्रशासकीय मंजुरी
बेंगळूर : बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर येथील किल्ल्यामध्ये ‘थीम पार्क’ निर्माण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. 30 कोटी रुपये खर्चातून ही योजना साकार करण्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी विधानसौधमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. ब्रिटिशांविरुद्ध लढा दिलेल्या कित्तूर राणी चन्नम्मा आणि कित्तूरमधील शूरवीरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कित्तूर किल्ल्यात थीम पार्क निर्माण केले जाणार आहे. या योजनेकरिता 30 कोटी रुपये खर्च करण्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
हलगा येथील जमिनी गमावलेल्यांना विशेष भरपाई?
अमृत योजनेंतर्गत बेळगावनजीकच्या हलगा येथे 70 दशलक्ष लिटर क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया युनिट निर्माण करण्यासाठी जमिनी संपादित केल्या आहेत. या जमिनीच्या मालकांना 21.40 कोटी रुपये विशेष भरपाई देण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे.