For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूर न.पं.तील भंगार साहित्याची चोरी

10:42 AM May 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
खानापूर न पं तील भंगार साहित्याची चोरी
Advertisement

कर्मचारी-कंत्राटदारांकडे मुद्देमाल सापडूनही कारवाई करण्यास कुचराई : लोकायुक्तांकडे तक्रार करणार

Advertisement

खानापूर : साठवणूक करून ठेवलेल्या नगरपंचायतीच्या भंगाराची चोरी झाल्याची घटना गेल्या काही दिवसांपूर्वी घडली आहे. याबाबत नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी दबावाखाली बोटचेपी धोरण अवलंबल्याने चोरी करणाऱ्यांना पाठिशी घालण्याचा प्रकार घडल्याने काही नगरसेवकानी याबाबत नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारल्याने मुख्याधिकारी रजेवर गेल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. याबाबत माहिती अशी की, नगरपंचायतीच्या आंबेडकर उद्यानातील जलशुद्धीकरण केंद्रानजीक नगरपंचायतीचे शहरातील वेगवेगळ्या कामावरील तसेच पाणीपुरवठा विभागातील जुने भंगार एकत्रित करून ठेवण्यात आले होते. या भंगाराची तसेच काही चांगल्या वस्तूंची चोरी गेल्या आठ दिवसापूर्वी नगरपंचायतीचे कर्मचारी आणि एका कंत्राटदाराच्या संगणमताने चोरी करून मोठ्या टेंपोतून हे साहित्य वाहतूक करत असल्याची माहिती नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना मिळाली. यानंतर मुख्याधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी या टेंपोचा पाठलाग करून दादोबानगर येथे हा टेंपो ताब्यात घेतला. याबाबतची माहिती पोलिसाना देण्यात आली. पोलिसानी हा टेंपो ताब्यात घेऊन त्या दिवशी रात्री पोलीस स्थानकातील आवारात नेण्यात आला. हा टेंपो दोन दिवस मुद्देमालासह पोलीस स्थानकात होता. त्यानंतर याबाबत मुख्याधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आल्याने मुख्याधिकाऱ्यांनी या प्रकरणातून काढता पाय घेतला असून त्यांनी रजेवर जाणेच पसंद केले आहे. गेल्या गुरुवारपासून ते रजेवर गेल्याचे समजते. याबाबत सोमवारी निर्णय घेण्यात येणार होता. मात्र मुख्याधिकारी सोमवारीही हजर झाले नसल्याने मुख्याधिकाऱ्यांवर दबाव असल्याचे स्पष्ट होत आहे.

सामानाची संगणमताने चोरी होत असल्याची चर्चा

Advertisement

गेल्या काही वर्षापासून नगरपंचायतीच्या सामानाची संगणमताने चोरी होत असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीही अशीच चोरी होत होती. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत कानाडोळा केल्याने अनेकांचे फावले होते. काही नगरसेवकांचीही याला साथ असल्याचे बोलले जात आहे. अशा चोरीतून लाखो रुपयाचे नुकसान नगरपंचायतीचे झाले आहे. भविष्यात याबाबत नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यानी जागृत राहून वेळोवेळी जुन्या भंगाराची योग्यप्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. तसेच पाणीपुरवठा आणि विद्युतपुरवठा विभागातही मोठ्या प्रमाणात अशाप्रकारे घटना घडत असल्याचे बोलले जात आहे. यासाठी नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यानी भविष्यात खबरदारी घेणे गरजेचे आहे.

कठोर कारवाई करण्याची मागणी

याबाबत काही नगरसेवकानी आक्षेप घेतला असून चोरी करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष नारायण मयेकर आणि माजी स्थायी समिती चेअरमन लक्ष्मण मादार यांनी केली आहे. याबाबत तरुण भारतशी बोलताना लक्ष्मण मादार म्हणाले, मुख्याधिकाऱ्यानी चोरी झाल्यानंतर तातडीने कारवाई केली. मात्र नंतर ते कोणाच्या दबावाखाली आले आहेत. हे स्पष्ट झालेले नाही. मुख्याधिकाऱ्यांवर दबाव घालणारे कंत्राटदाराला आणि कर्मचाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र याबाबत कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न झाल्यास माझ्याकडे असलेल्या पुराव्यानिशी मी दाद मागणार आहे. तसेच खानापूर येथे लोकायुक्त्यांचा जनसंपर्क सभेवेळी मी याबाबत सविस्तर तक्रार मांडणार आहे. असे त्यांनी सांगितले. यापूर्वीही अशाच घटना घडल्या आहेत. त्यामुळे या चोरीवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

Advertisement
Tags :

.