बंद घराचा कुलूप तोडून दीड लाखाची चोरी
भरवस्तीतील कपिलेश्वर मंदिरामागील प्रकार
प्रतिनिधी/ बेळगाव
कपिलेश्वर मंदिरापाठीमागील एका बंद घराचा कुलूप तोडून सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे. शनिवारी दुपारी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून रात्री खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
संध्या आनंद जालगार यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. शुक्रवार दि. 26 जुलै रोजी दुपारी 3 वाजता आपल्या घराला कुलूप लावून संध्या व त्यांचे कुटुंबीय कंग्राळी बुद्रुक येथील आपल्या मुलीकडे गेले होते. शनिवार दि. 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता त्या घरी परतल्या. त्यावेळी घराचा दरवाजा उघडा होता. त्यामुळे घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले.
चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला असून तिजोरीचा लॉकर फोडून 19 ग्रॅम सोन्याचे दागिने व 50 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण सुमारे दीड लाखाचा ऐवज पळविला आहे. घटनेची माहिती समजताच खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. खडेबाजार पोलीस पुढील तपास करीत आहेत.