‘शंखा’च्या मांसाची चोरी
फ्रान्स या देशात चोरीचे एक अनोखे प्रकरण उघडकीस आले आहे. ही चोरी एका शेतकऱ्याच्या कोल्ड स्टोरेजमधून झाली आहे. चोरांनी शंखाचे (स्नेल्स) मांस चोरुन नेले आहे, अशी या शेतकऱ्याची तक्रार आहे. आता यात मोठे काय, असा प्रश्न कोणालाही पडू शकेल. पण या चोरीच्या मालाची किंमत समजल्यानंतर पोलीसांनाही आश्चर्य वाटले. ही चोरी तब्बल 82 लाख रुपयांची आहे. शंखाच्या मांसाची किंमत इतकी असू शकते, हे समजून आपल्यालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. तथापि, हे अत्यंत उच्च प्रतीचे शंख होते. ते फ्रान्समधल्या अनेक पंचतारांकित हॉटेलांना पाठविण्यासाठी उत्पादित करण्यात आले होते. ते चोरीला गेल्यामुळे मोठा आर्थिक फटका बसल्याचे या शेतकऱ्याने तक्रारीत स्पष्ट केले आहे. चोरट्यांनी शंखाच्या 450 किलो मांसावर डल्ला मारला आहे.
शंखांचे मांस जगात अनेक स्थानी खाल्ले जाते. त्याच्यापासून चवदार पदार्थ बनविले जातात. विशेषत: युरोप आणि अमेरिकेत ते विशेष लोकप्रिय आहे. त्याला मागणी मोठी असल्याने आता शंखांचे उत्पादन अनेक शेतकरी आपल्या शेततळ्यांमध्ये करतात. हा उत्पादन व्यवसाय युरोपमध्ये गेल्या चार दशकांपासून भरभराटीला आला आहे, अशी माहिती दिली जाते. विशिष्ट प्रकारच्या शंखांच्या मांसाला प्रचंड किंमत येते. हे मांस पौष्टिक असल्याचे समजले जाते. त्यामुळे अनेक लोक त्याचा आपल्या आहारात सातत्याने समावेश करतात. अनेक देश आता या मांसाची निर्यातही करु लागले आहेत. अनेक शेतकरी असे आहेत, की जे प्रत्येक वर्षी कोट्यावधी शंखांचे उत्पादन करतात. हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात लाभदायक असल्याचा त्यांचा अनुभव आहे. भारतातही शंखशेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. कमी भांडवलातही हा व्यवसाय करता येतो, असे काही तज्ञांचे म्हणणे आहे. शंखाच्या मांसाला जगभरात, विशेषत: आर्थिकदृष्ट्या प्रबळ असणाऱ्या देशांमध्ये मोठी मागणी असल्याने भारतासारख्या विकसनशील देशाने हा व्यवसाय भरभराटीला आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही अनेकांचे म्हणणे आहे. शंखांचा उपयोग केवळ खाण्यासाठीच नव्हे, तर सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे मांसाप्रमाणे कवचालाही मागणी असते. त्यामुळे हे एक बहुउपयोगी उत्पादन मानले जाते. मात्र अजूनही हे उत्पादन तसे दुर्लक्षितच आहे.