बेळगुंदीत दुचाकी वाहनाची चोरी
अवघ्या तीन तासात मिळाली दुचाकी : चोरीच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती
वार्ताहर/किणये
बेळगुंदी मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका मेडिकल दुकानासमोर लावण्यात आलेली दुचाकी चोरीला गेली. मात्र अवघ्या तीन तासातच दुचाकी मिळाली. हा चोरीचा प्रकार बुधवारी दि. 25 रोजी पहाटे 5.15 वा. घडला. चोरी करतानाचे सर्व दृश सदर दुकानमालकाच्या सीसी कॅमेऱ्यात कैद झाले आहे. बेळगुंदी गावात दुचाकी चोरीला गेल्यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण यापूर्वी सोनोली गावात एकाच रात्री 17 तांब्यांच्या हंड्यांची चोरी झाली होती. या परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
चालू होत नसल्याने दुचाकी सोडून पलायन
मोनिका जोसेफ फार्नांडिस व जोसेफ अॅन्थोनी फर्नांडीस यांचे बेळगुंदी येथे मेडिकलचे दुकान आहे. रोजच्याप्रमाणे मंगळवारी रात्री 10 वा. दुकान बंद केले. तसेच जोसेफ यांनी आपली हिरोहोंडा दुचाकी दुकानासमोर लावली होती. सकाळी उठल्यानंतर 7 वा. गाडी चोरीला गेली असल्याच्या त्यांच्या निदर्शनास आले. फर्नांडिस यांनी आपल्या दुकानातील व दुकानाच्या बाहेर असलेल्या सीसी कॅमेरा पडताळून पाहिला. यामध्ये बुधवारी पहाटे 5.15 च्या दरम्यान एक अनोळखी व्यक्ती दुकानासमोर आली. त्यांनी पहिल्यांदा अनेक दुचाकीला हात लावून पाहिला. ती दुचाकी लॉक होती नंतर बाजूलाच असलेल्या एचएफ डिलक्स गाडीला हँडल लॉक नव्हता हे पाहून त्या चोरट्यांनी गाडी तेथून पळवली.
मात्र सदर दुचाकी चालू झाली नसल्याने व पहाटेच्या वेळी या रस्त्यावरून फिरायला येणाऱ्या नागरिकांची वर्दळ वाढल्यामुळे चोरट्याने चोरलेली दुचाकी काही अंतरावर असलेल्या गॅरेजसमोर ठेवून पलायन केले. अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. सीसी कॅमेऱ्यात दुचाकी गेल्याचे निदर्शनास येताच फर्नांडिस यांनी गावात याबाबत माहिती दिली. ग्रामस्थांच्यावतीने गावात काही ठिकाणी लाऊड स्पिकर बसविण्यात आलेले आहेत. मंदिरातून या स्पिकरच्या माध्यमातून बेळगुंदी गावात पहाटे दुचाकी चोरीला गेले असल्याचे सांगण्यात आले. यानंतर आपल्या गॅरेजसमोर एक दुचाकी असल्याचे महादेव बेटगेरीकर यांच्या लक्षात आले व त्यांनी फर्नांडिस यांना संपर्क करून सदर वाहन घेऊन जाण्यास सांगितले. याबाबत आपण पोलिसांमध्ये तक्रार देणार होतो. मात्र तेवढ्यातच आपल्याला दुचाकी मिळाली असल्याने सध्यातरी पोलिसांमध्ये तक्रार दिली नाही, असे जोसेफ फर्नांडिस यांनी सांगितले.
घरासमोर उभी केलेल्या दुचाकीची चोरी
बेळगाव मंडोळी रोड, गोडसेवाडी येथे घरासमोर उभी करण्यात आलेली एक होंडा अॅक्टिव्हा चोरण्यात आली आहे. शनिवार दि. 21 सप्टेंबर रोजी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. कृष्णाजी धोंडोपंत मुतालिक यांची केए 22, ईएम 0859 क्रमांकाची होंडा अॅक्टिव्हा चोरण्यात आली आहे. दि. 20 सप्टेंबर रोजी रात्री त्यांनी आपण राहात असलेल्या अपार्टमेंटसमोर दुचाकी उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता पाहिले असता दुचाकीची चोरी झाल्याचे उघडकीस आले. बुधवारी यासंबंधी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले आहे.