कर्नाटक, केरळ ए संघ विजेते
उपकनिष्ठ राष्ट्रीय नाईन ए साईड फुटबॉल : मध्यप्रदेश, केरळ ब संघांना उपविजेतेपद
बेळगाव : कर्नाटक राज्य नाईन ए साईड फुटबॉल संघटना आयोजित बाराव्या उपकनिष्ठ राष्ट्रीय नाईन ए साईड फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून मुलांच्या विभागात केरळ संघाने तर मुलींच्या विभागात कर्नाटकने मध्यप्रदेश संघाचा पराभव करुन विजेतेपद पटकाविले. बेळगाव टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावरती घेण्यात आलेल्या मुलींच्या अंतिम सामन्यात कर्नाटकाने मध्यप्रदेशचा 6-0 असा पराभव केला. या सामन्यात चौथ्या मिनिटाला कर्नाटकाच्या निशीता एस.च्या पासवर इंद्रायणी पावनोजीने 1-0 ची आघाडी मिळवून दिली.
आकराव्या मिनिटाला इंद्रायणीच्या पासवर ममताने दुसरा गोल केला तर 24 व्या मिनिटाला तिसरा गोल करुन 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 33 व्या मिनिटाला निश्चिता एस.च्या पासवर ममताने तिसरा गोल केला. 41 व्या मिनिटाला ममताच्या पासवर निशिता एस.ने चौथा गोल केला तर 43 मिनिटाला ममताने पाचवा गोल केला. 47 मिनिटाला इंद्रायणी पावनोजीने सहावा गोल करुन 6-0 ची महत्वाची आघाडी मिळवून दिली. त्या सामन्यात मध्यप्रदेश संघाला गोल करण्यात अपयश आले. मुलांच्या अंतिम सामन्यात केरळ अ संघाने केरळ ब संघाचा 3-0 असा पराभव करुन विजेतेपद पटकाविले.
21 व 27 व्या मिनिटाला केरळच्या विजयाने सलग दोन गोल केले. तर दुसऱ्या सत्रात 39 मिनिटाला राजेंद्रने तिसरा गोल करुन 3-0 ची आघाडी मिळवून दिली. कर्नाटक मुलींच्या संघात कर्णधार ममता मुल्ला, वैष्णवी होसमनी, जान्हवी मलवाडकर, गायत्री बडीगेर (सर्व बेळगाव), निकिसा एस., जोत्स्ना कार्तिक, सागरीका आर., प्रतीक्षा पडीमनी, जिवीका गोंधळी (सर्व बेंगळूर) तर प्रशिक्षक म्हणून जोसेफ परेरा, अरुण कांबळे, महांतेश गवी, सुनिल देसाई यांचे प्रोत्साहन लाभले. सामन्यानंतर उपमहापौर आनंद चव्हाण, संघटनेचे सरचिटणीस एकनाथ साळुंखे, लक्ष्मण पडीमनी, एकनगौडा मुद्देनगौडा आदी मान्यवरांच्या हस्ते विजेता व उपविजेत्या संघांना चषक, प्रमाणपत्र व पदके देवून गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून रॉयस्टीन जेम्स, कृष्णा मुचंडी, ओमकार शिंदोळकर, अभिषेक चेरेकर यांनी काम पाहिले.