कडोलीत दोन लाखांच्या बैलजोडीची चोरी
चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने भीतीचे वातावरण : शेतकऱ्यांत एकच खळबळ
वार्ताहर/कडोली
कडोली येथे चोरांनी उच्छाद मांडला असून,बुधवारी रात्री चोरांनी शेतामधील बंगल्यातून सुमारे दोन लाख किंमतीची बैलजोडी चोरून नेल्याने शेतकऱ्यात एकच खळबळ माजली आहे. कडोली गावात आणि शेत शिवारात गेल्या काही महिन्यापासून चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील सावकार गल्ली, मायाण्णा गल्लीतून नुकत्याच चार दुचाकी चोरीला गेल्या, बसवाण्णानगर येथे बैलजोडी चोरून नेण्याचा प्रयत्न झाला. शिवाय सेट्रिंग कामाच्या प्लेटीही चोरण्याचे प्रकार घडले आहेत.
बुधवारी रात्री कडोली, काकती रस्त्यावर असणाऱ्या महांतेश देसाई यांची शेतातील बंगल्यातून पुढील काही महिन्यात बैलगाडी शर्यतीसाठी जुंपणारी सुमारे 2 लाख रु. किंमतीची बैलजोडी (वासरू) चोरून नेल्याने शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली आहे. चोरांनी शेत शिवारातील किंमती अवजारे, किंमती बैल चोरून नेण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने यापुढे शेतात किंमती अवजारे, पंपसेट ठेवणे देखील अवघड झाले आहे. डौलदार आणि देखणी बैल चोरीला गेल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.
पोलिसांची गस्त हवी
कडोली आणि परिसरात आता दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढले आहे. शिवारातूनही अनेक ठिकाणी पक्के रस्ते झाले आहेत. त्यामुळे चोरांना चोरी करून पलायन करण्यास वाव मिळत आहे. तेव्हा पोलीस खात्याने कडोली गावानजीकच्या जाफरवाडी, कडोली-देवगिरी, कडोली.-होनगा, कडोली-काकती आणि गावातील प्रमुख ठिकाणी गस्त घालावी अशी मागणी करण्यात येत आहे. जेणेकरून चोरीच्या प्रमाणात घट होण्यास मदत होणार आहे.