टेंगिनकेरा गल्लीत बाकड्याची चोरी
बेळगाव : खडेबाजार रोडवरील टेंगिनकेरा गल्ली क्रॉस येथील होळी कामाण्णा मंदिराच्या आजूबाजूला केरकेचरा टाकण्यासह हॉटेलमधील खरकटे टाकले जात होते. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात आल्याने काही महिन्यापूर्वी महापालिकेच्यावतीने त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून बाकडे ठेवण्यासह झाडांचे कुंडे ठेवले होते. पण तेथील एका बाकड्याची चोरी करण्यात आली आहे. शहर व परिसरातील ब्लॅकस्पॉट हटविण्यासाठी महानगरपालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. पण त्याला नागरिकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने विविध ठिकाणी ब्लॅकस्पॉट तयार होत आहेत. खडेबाजार रोडवरील टेंगिनकेरा गल्ली क्रॉसवरील होळी कामण्णा मंदिराभोवती ओला व सुका कचरा टाकण्यासह मांसाहारी हॉटेलमधील खरकटेदेखील टाकण्यात येत होते.
त्यामुळे होळी दिवशी या ठिकाणी दरवर्षी पूजाअर्चा केली जाते. पण त्या दिवशी केरकचऱ्यामुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात आल्याचे तेथील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर याबाबत त्यांनी स्थानिक नगरसेवक जयतीर्थ सौदत्ती यांच्याकडे तक्रार केली. ही बाब गांभीर्याने घेत नगरसेवकांनी मनपा अधिकाऱ्यांकडे तक्रार करून तातडीने कचऱ्याची उचल करण्यासंदर्भात सूचना केली. त्यामुळे मंदिराभोवती टाकण्यात आलेल्या कचऱ्याची उचल करून पाण्याची फवारणी करत स्वच्छता करण्यात आली होती. त्या ठिकाणी कचरा टाकण्यात येऊ नये यासाठी महानगरपालिकेच्यावतीने शोभेची झाडे आणि बाकडे ठेवण्यात आले होते. त्यानंतर काही दिवस मंदिराभोवती कचरा टाकण्यात आला नाही. पण त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या एका बाकड्याची चोरी झाली आहे. त्यामुळे याकडे महानगरपालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.