स्टेशन रोडवरील एका बाकाची चोरी
बेळगाव : शहर व उपनगरातील ब्लॅकस्पॉट हटवून त्या ठिकाणी महानगरपालिकेच्यावतीने नागरिकांना बसण्यासाठी बाक तसेच शोभेची झाडे लावत आहेत. मात्र महागडे बाक चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. टेंगिनकेरा गल्ली पाठोपाठ स्टेशन रोडवरील एका बाकाची चोरी झाली आहे. त्यामुळे याबाबत खडेबाजार पोलिसांत तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासणीचे काम हाती घेतले आहे. ज्या ठिकाणी ब्लॅकस्पॉट आहेत. तेथील कचऱ्याची उचल करून त्या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी बाक ठेवले जात आहेत.
इतकेच नव्हे तर शोभेची झाडे असलेल्या कुंड्या ठेवल्या जात आहेत. मात्र सदर बाक चोरी होण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. चार दिवसांपूर्वी टेंगिनकेरा गल्ली क्रॉसनजीकच्या होळी कामण्णा मंदिर आवारातून बाकाची चोरी झाली होती. याबाबत तरुण भारतमधून वृत्त प्रसिद्ध होताच महापालिकेच्या सफाई कामगारांनी सदर बाकड्याचा शोध घेऊन तो पुन्हा त्या ठिकाणी ठेवला आहे. या पाठोपाठ आता स्टेशन रोडवरील एका बाकाची चोरी झाली आहे. काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणचा ब्लॅकस्पॉट हटवून चार बाक ठेवण्यात आले होते. त्यापैकी एका बाकाची चोरी झाली आहे. ही बाब उघडकीस येताच नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी खडेबाजार पोलिसांना याबाबतची माहिती दिली. यामुळे पोलिसांनी त्या ठिकाणी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम हाती घेतले आहे.