Sangli Crime News : सांगलीवाडी, विश्रामबाग परिसरात घरफोडी, 5 लाखांचा ऐवज लंपास
घरात प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले दागिने चोरून नेले
सांगली : शहरातील सांगलीवाडी आणि वश्रामबाग येथील कुंभार मळा येथे बंद फ्लॅट फोडले. सांगलीवाडी येथे साडेतीन लाखाचे दागिने आणि विश्रामबाग कुंभार मळा येथे बंद फ्लॅट फोडून दीड लाखाचे दागिने चोरून नेण्यात आले आहेत.
याप्रकरणी सांगलीवाडी येथील अश्विनी अनुराग पाटील वय 37 रा. जी. के. पवार टॉवर विंग ए फ्लॅट नंबर 301 यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर विश्रामबाग कुंभार मळा येथील अभिजीत विजय नाईक वय 31 रा. चंद्रलोक अपार्टमेंट सी. विंग फ्लॅट नंबर सात, आर्या हॉटेलजवळ कुंभारमळा सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगलीवाडी येथे जी. के. पवार टॉवर आहे या टॉवरमध्ये फ्लॅट नंबर 301 मध्ये अश्विनी पाटील या रहातात. 29 मे रोजी सकाळी कुंटुंबासहित बाहेर गावी गेल्या होत्या. त्याच्या बंद फ्लॅटच्या दरवाजाच्या कुलुप आणि कडी-कोयंडा कशाने तरी तोडला आहे. त्यानंतर घरात प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले दागिने चोरून नेले आहेत.
यामध्ये 25 ग्रॅमचे सोन्याचे त्रिकोणी पदक असलेले गंठण दीड लाख किंमत, 15 ग्रॅम सोन्याचे मिनी गंठण 90 हजार रूपये, दहा ग्रॅमच्या सोन्याचे दहा हजार रूपयाचे वेढण. अर्धा तोळ्याची 30 हजार रूपये किंमतीची सोन्याची चेन तीन ग्रॅम सोन्याचे कानातील टॉप्स 18 हजार रूपये किंमत असे एकूण तीन लाख 48 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आहेत.
अश्विनी पाटील या सायंकाळी घरी परत आल्यानंतर त्यांच्या लक्षात हा प्रकार आला त्यांनी तात्काळ सांगली शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला पोलिसांनी याचा तपास सुरू केला आहे. दुसरी घरफोडी ही विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विजयनगर-कुंभारमळा येथे झाली.
याठिकाणी असणाऱ्या चंद्रलोक अपार्टमेंटमधील सी. विंग येथील फ्लॅट नंबर सी सात याठिकाणी अभिजीत नाईक हे रहातात. 29 मे रोजी दुपारी बाराच्या सुमारास ते घर बंद करून बाहेर गेले होते. त्यावेळी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले आहेत. यामध्ये 53 हजार रूपयेचे झुबे, फुले नेण्यात आले आहेत.
साडेसात ग्रॅम सोन्याचे 50 हजार 215 किंमतीची दागिने तसेच रोख 50 हजार रूपये असा एकूण एक लाख 45 हजार रूपये किंमतीचे दागिने नेण्यात आले आहेत. दुपारनंतर पाटील घरी आल्यावर त्यांना या घरफोडीची माहिती समजली त्यांनी तात्काळ विश्रामबाग पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणांचा तपास सुरू केला आहे.
एकाच दिवशी सांगली शहराच्या हद्दीत आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करण्यात आली आहे. त्यामुळे या घरफोडीमुळे पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. त्यांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजचही तपासणी सुरू केली आहे.