युवा सेनेचा टी-20 मालिकाविजय
युवा सेनेचा टी-20 मालिकाविजय मालिकेत 4-1 फरकाने यश : शिवम दुबे सामनावीर तर वॉशिंग्टन सुंदर मालिकावीर
वृत्तसंस्था/ हरारे
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा 42 धावांनी पराभव केला. या विजयासह युवा संघाने मालिका 4-1 फरकाने जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत 6 बाद 167 धावा केल्या. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना यजमान झिम्बाब्वेचा संघ 125 धावांत ऑलआऊट झाला. सामन्यात 12 चेंडूत 26 धावा व दोन बळी घेणाऱ्या शिवम दुबेला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले तर अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. विशेष म्हणजे, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाने पहिला सामना गमावल्यानंतर उर्वरित चारही सामन्यात शानदार कामगिरी साकारत मालिकाविजय मिळवला.
टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या 168 धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ 18.3 षटकांत 125 धावांवर ऑलआऊट झाला. सलामीवीर मेडवेरेला भोपळाही फोडता आला नाही. मारुमणीने 27 तर ब्रायन बेनेटने 10 धावा केल्या. याशिवाय, डियॉन मेयर्सने शानदार फलंदाजी करताना 32 चेंडूत 34 धावांचे योगदान दिले. फराज अक्रमने 13 चेंडूत 27 धावा केल्या. इतर फलंदाज मात्र ठराविक अंतराने बाद होत गेले. भारताकडून मुकेश कुमारने सर्वाधिक 22 धावांत 4 विकेट्स घेतल्या. तर शिवम दुबेने दोन गड्यांना माघारी पाठवले. विशेष म्हणजे, झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी पहिला सामना जिंकत धमाकेदार सुरुवात केली होती पण उर्वरित चारही सामन्यात मात्र त्यांचे खेळाडू फ्लॉप ठरले.
हरारे स्पोर्ट्स मैदानावर झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रजाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने भारताच्या डावाची सुरुवात केली. यशस्वी जैस्वालने आक्रमक सुरुवात करत सिकंदर रजाला दोन षटकार मारले. यानंतर पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर रजाने जैस्वालला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. जैस्वाल 12 धावांवर बाद झाला. यानंतर अभिषेक शर्मा देखील आक्रमक फलंदाजी करण्याच्या इराद्यानं मैदानात उतराला पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. शर्मा 14 धावा करुन बाद झाला. यानंतर कॅप्टन शुभमन गिल केवळ 13 धावा करु शकला. यावेळी टीम इंडियाची 3 बाद 40 अशी स्थिती झाली होती.
सॅमसनचे अर्धशतक, दुबेची फटकेबाजी
भारतीय संघ बॅकफूटवर आलेला असताना संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी 65 धावांची भागीदारी करत डाव सावरला. सॅमसनने शानदार अर्धशतकी खेळी साकारताना 45 चेंडूत 58 धावा केल्या. मात्र फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. सॅमसनने आपल्या खेळीत चार षटकार आणि एक चौकार मारला. त्याचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरे अर्धशतक ठरले. रियान परागने 22 धावा केल्या. सॅमसन व रियान पराग बाद झाल्यानंतर शिवम दुबेने फटकेबाजी केली. शिवम दुबेच्या या कामगिरीच्या जोरावर भारतानं 150 धावांचा टप्पा पार केला. दुबेने 26 तर रिंकू सिंगनं 11 धावा केल्या. भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 6 बाद 167 धावा केल्या. झिम्बाब्वेकडून मुजारबानीने 2 तर सिकंदर रजा, नागरवा व मावुता यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
भारत 20 षटकांत 6 बाद 167 (यशस्वी जैस्वाल 12, शुभमन गिल 13, अभिषेक शर्मा 14, संजू सॅमसन 45 चेंडूत 58, रियान पराग 22, शिवम दुबे 12 चेंडूत 26, रिंकू सिंग नाबाद 11, सुंदर नाबाद 1, मुजारबानी 2 बळी, सिकंदर रजा, एन्गरेवा व मावुता प्रत्येकी एक बळी).
झिम्बाब्वे 18.3 षटकांत सर्वबाद 125 (मधेवेरे 0, मारुमणी 27, डियॉन मेयर्स 34, फराज अक्रम 13 चेंडूत 37, मुकेश कुमार 22 धावांत 4 बळी, शिवम दुबे 25 धावांत 2 बळी, तुषार देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर व अभिषेक शर्मा प्रत्येकी एक बळी).
टीम इंडियाचा असाही अनोखा विक्रम
सिकंदर रजाने झिम्बाब्वेच्या डावाची पहिले षटक टाकले. याच ओव्हरमध्ये यशस्वी जैस्वालच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने अनोखा विक्रम आपल्या नावे केला. भारताने डावाच्या पहिल्याच बॉलवर 13 धावा केल्या. यापूर्वी पाकिस्तानने पहिल्या बॉलवर 10 धावा केल्या होत्या. रजाने झिम्बाब्वेच्या डावाचे पहिले षटक टाकले. पहिला बॉल नो टाकला. या बॉलवर जैस्वालने षटकार मारला. भारताला नो बॉलची एक रन मिळाल्यानं 7 धावा झाल्या. दुसरा बॉल फ्री हिट मिळाल्याने जैस्वालने षटकार मारला. यावेळी 1 बॉलवर 13 धावा असे समीकरण झाले. जैस्वालचे दोन षटकाराच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा विक्रम मोडला. पाकिस्तानच्या नावावर यापूर्वी पहिल्या बॉलवर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम होता. पाकिस्तानने एका बॉलवर 10 धावा केल्या होत्या. 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्यांनी अशी कामगिरी केली होती.