युवापिढीने जिद्दीने सायकलफेरीत सहभागी व्हावे
महाराष्ट्र एकीकरण समिती युवा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आवाहन
बेळगाव : 1 नोव्हेंबर हा दिवस सीमाभागात काळा दिन म्हणून पाळला जातो. मागील 69 वर्षांपासून मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्याचा हा लढा सुरू असून अद्याप यश मिळालेले नाही. त्यामुळे आता युवापिढीने जिद्दीने या लढ्यामध्ये सहभागी व्हावे. तसेच काळ्यादिनी काढण्यात येणाऱ्या सायकल फेरीमध्ये मोठ्या संख्येने युवा सहभागी होतील, असा विश्वास सीमाभागातील युवा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. मराठा मंदिर येथे रविवारी म. ए. समिती युवा कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक शिवाजी मंडोळकर होते. बैठकीमध्ये सांगली व निपाणी येथील युवकांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्राच्या सांगली भागातही काळादिन गांभीर्याने पाळला जाईल, अशी ग्वाही देण्यात आली. यावेळी युवानेते शुभम शेळके, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, पियुष हावळ, लक्ष्मीकांत पाटील, मनोहर हुंदरे, चंद्रकांत पाटील, रमेश माळवी, अशोक घगवे, अभिजीत मजुकर, बळीराम पाटील, शांताराम होसूरकर, राजू पाटील, भूपाल पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. रवी रेडेकर यांनी आभार मानले.