युवकाचे फळफळले भाग्य
कोणाचे भाग्य केव्हा फळफळेल, याचे अनुमान काढणे भल्याभल्यांसाठीही अशक्य आहे. सहज म्हणून काहीतरी करायला जावे आणि मोठे घबाड हाती यावे, असे अनेकांच्या संदर्भात घडते. अमेरिकेत अशीच एक घटना नुकतीच घडली आहे. या देशाच्या मिशिगन प्रांतात राहणाऱ्या एका युवकाचे भाग्य असेच उजळले आहे. त्याने सहज म्हणून, कोणताही विचार न करता, किंवा हिशेब न मांडता एक लॉटरीचे तिकिट खरेदी केले. ते लागले आणि तो अक्षरश: कोट्याधीश झाला.
असे प्रकार अनेकदा घडतात. तेव्हा या घटनेत नवे ते काय, असा प्रश्न निर्माण झाल्यासा आश्चर्य नाही. खरेतर जे लोक लॉटरीची तिकिटे विकत घेतात, त्यांच्यापैकी कोणाला ना कोणाला लॉटरी लागतच असते. तशीही ती या युवकालाही लागली. त्यामुळे आश्चर्य त्यात फारसे नाही. तथापि, हा युवक कधीही लॉटरी खेळत नाही. अशा प्रकारे पैसे मिळविण्याचा प्रयत्न करण्यावर त्याचा विश्वास नाही. त्यामुळे त्याला लॉटरी तिकिटे काढण्याचे व्यसन नाही. त्याच्या म्हणण्यानुसार त्याने आजवरच्या त्याच्या आयुष्यात जास्तीत जास्त दोन ते तीन वेळा लॉटरी ची तिकिटे काढली आहेत. यावेळी त्याने बऱ्याच वर्षांमधून प्रथमच तिकिट काढले होते. ते त्याचे भाग्य उजळवणारे ठरेल, अशी कोणतीही अपेक्षा त्याने बाळगली नव्हती. त्यामुळे त्याला या लॉटरीचे विशेष वाटत आहे.
त्याने 20 डॉलर्सचे तिकिट काढले आणि त्याला 20 लाख डॉलर्सचा जॅकपॉट लागला. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम जवळपास 16 कोटी 70 लाख रुपये होते. याचाच अर्थ असा की हा युवक त्याने तिकिटासाठी खर्च केलेल्या रकमेच्या एक लाख पट अधिक श्रीमंत झाला आहे. या सर्व प्रकारामुळे त्याला आनंदापेक्षा आश्चर्य अधिक वाटत आहे, असे त्याने नंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना स्पष्ट केले.