For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

योगी केलेलं कर्म देवाला अर्पण करतो

06:37 AM Nov 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
योगी केलेलं कर्म देवाला अर्पण करतो
Advertisement

अध्याय चौथा

Advertisement

अखंड आनंदात असलेल्या कर्मयोग्याला वाट्याला आलेलं कर्म करायचं एव्हढंच त्याला माहित असतं. त्यामुळे त्याला अकर्म म्हणजे काय याचीही कल्पना असते. तो स्वत:ला अकर्ता समजत असतो ह्या अर्थाचा

तत्त्वविद्योगयुक्तात्मा करोमीति न मन्यते।

Advertisement

एकादशानीन्द्रियाणि कुर्वन्ति कर्मसंख्यया ।।8।।

हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार कर्मयोग मनापासून आचरणाऱ्याला कर्मयोगाचे निरपेक्षतेनं कर्म करण्याचे तत्व समजलेलं असतं. ध्येय निश्चित असल्याने तो करत असलेल्या कामात स्वत:च्या मनाने भर घालून अकर्म म्हणजे वाट्याला आलेल्या कामापेक्षा वेगळं कर्म करत नाही. इतर कोणत्याही कामाचा विचार डोक्यात नसल्याने त्याची इंद्रिये एकावेळी एकच काम एकाग्रतेने करत असतात. असं करत असताना हे कर्म ईश्वरांचं असून तेच माझ्याकडून ते करून घेत आहेत ही जाणीव मनात पक्की असल्याने तो स्वत:ला अकर्ता समजत असतो. ईश्वरी प्रेरणेनुसार आपली डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिये तसेच हात, पाय, वाणी, उपस्थ, गुद ही पाच कर्मेंद्रिये आणि मन अशी अकरा इंद्रिये कार्य करत आहेत हे लक्षात घेऊन तो इंद्रिये करत असलेल्या कर्मातून कोणत्याही अपेक्षा बाळगत नसल्याने त्यापासून अलिप्त असतो. पुढं बाप्पा सांगतायत की, असं कर्म करून झाल्यावर ते तो ब्रह्मार्पण करत असल्याने पाप पुण्यातून मुक्त होतो.

तत्सर्वमर्पयेद्ब्रह्मण्यपि कर्म करोति यऽ ।

न लिप्यते पुण्यपापैर्भानुर्जलगतो यथा ।।9 ।।

अर्थ- योगी जे कर्म करतो ते सर्व ब्रह्माला अर्पण करतो. जलामध्ये प्रतिबिंबित असलेला सूर्य ज्याप्रमाणे जलाने लिप्त होत नाही त्याप्रमाणे तो त्या कर्माच्या पुण्य अथवा पाप यांनी लिप्त होत नाही.

विवरण- नवविधाभक्तीमध्ये अर्पणभक्ती हा एक प्रकार आहे. योगी त्यानुसार ईश्वराने दिलेली प्रत्येक गोष्ट त्याला अर्पण करतो. ईश्वराने कर्म दिलेलं होतं ते त्यानं करून घेतलं ते त्याच्या इच्छेनुसार पूर्ण, अपूर्ण अशा कोणत्याही अवस्थेत असलं तरी तुझं कर्म तुलाच अर्पण या भावनेनं केलेलं कर्म तो ईश्वराला अर्पण करतो. कोणत्याही कर्माचं चांगलं वाईट फळ हे मिळतंच आणि ते भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो पण जो योगी ईश्वरानं दिलेलं कर्म करून ते ईश्वराला अर्पण करेल तो त्या कर्माच्या फळातून मुक्त होईल. त्यामुळे त्यातून निर्माण होणारे पापपुण्य भोगायला त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. यासाठी बाप्पा सूर्याचं उदाहरण देतात. ते म्हणतात, सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडतं त्याप्रमाणे योगी कर्म करताना दिसतो. सूर्याचं प्रतिबिंब जरी पाण्यात पडलेलं असलं तरी प्रत्यक्ष सूर्य पाण्यापेक्षा वेगळा असल्याने तो काही पाण्याने ओला होत नाही. त्याप्रमाणे कर्म ईश्वरार्पण करणारा योगी केलेल्या कर्मापासून अलिप्त राहतो. कर्म ईश्वरार्पण करण्याची भूमिका समजून घेण्यासाठी आपण नोकर मालक संबंधाचा विचार करू. समजा एखादा मनुष्य खाजगी अथवा सरकारी नोकरी करतोय. नोकरी कोणतीही असुदेत एक पथ्य नोकराला पाळावंच लागतं. ते म्हणजे मालकाने जे काम सांगितलं असेल ते कोणतेही प्रश्न न विचारता लगेच करून टाकायचं. असं जो वागेल तो नोकरीत यशस्वी होऊन मालकाला प्रिय होतो. बरं, नोकराला केलेल्या कामाचं फळ काय मिळालं याच्याशी काहीच देणेघेणे नसते. मालकाने सांगितलं त्याप्रमाणे केले की, चांगल्या वाईटाची जबाबदारी त्याच्यावर असं म्हणून तो नामानिराळा होतो. योगी तेच करत असतो. त्यानं मालकाच्या जागी ईश्वराला ठेवलेलं असतं. म्हणून योगी मिळालेलं काम करून ते त्यालाच अर्पण करतो. कर्माच्या चांगल्या वाईट परिणामांची जबाबदारी ईश्वरावर सोपवतो व स्वत: अलिप्त राहतो.

क्रमश:

Advertisement
Tags :

.