निरनिराळ्या दैवतांची केलेली उपासना ही ईश्वराचीच उपासना होत असते
अध्याय नववा
अहं विष्णुश्च रुद्रश्च ब्रह्मा गौरी गणेश्वरऽ । इन्द्राद्या लोकपालाश्च ममैवांशसमुद्भवाऽ ।। 39 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार बाप्पा सांगतात, विष्णु, रुद्र, ब्रह्मदेव, गौरी, गणेश ही माझीच रूपे आहेत. इंद्रादि लोकपाल देखील माझ्याच अंशापासून उत्पन्न झालेले आहेत. सृष्टीचे संचालन सुव्यवस्थित चालावे म्हणून ईश्वराने विविध देवता निर्माण केल्या असून त्यांना त्यांची कामे ठरवून दिलेली आहेत. त्यानुसार देव मंडळी त्यांची कामे पार पाडत असतात. म्हणून सृष्टीक्रम वर्षानुवर्षे बिनबोभाट चालू आहे. उदाहरणार्थ मृत्यूलोकातील जीवांकडून चांगली, वाईट कर्मे घडतात. त्यानुसार फळे भोगावी लागतात. त्यानुरूप योनीत त्याला पुनर्जन्म देण्याचे काम सृष्टीनिर्माते ब्रह्मदेव करतात, विश्वपालक विष्णू त्या योनीला अनुरूप असे भोग जीवाला मिळवून देतात, तर संहारकारी रुद्र बाल्य, प्रौढ, वृद्ध इत्यादी अवस्था देहाला प्राप्त करून देतात. त्या जीवाचे पूर्वकर्मानुसार यशापयशादी जीवन आदिशक्ती चालवत असते. असे अनेक देव नेमून दिलेली कार्ये युगानुयुगे सुव्यवस्थित पार पाडत आहेत. त्यासाठी आवश्यक ती शक्ती ईश्वराने त्यांना पुरवलेली आहे. ईश्वराने दिलेल्या बुद्धिनुसार ते त्यांचे अधिकार चालवत असतात. या सर्व देवांचे काम ईश्वराच्या अधिपत्याखाली चालू आहे. त्यात स्वत:च्या मनाने कोणताही बदल ते करत नाहीत पण मनुष्यप्राणी मात्र स्वत:चं डोकं लढवण्यात धन्यता मानत असतो. त्यामुळे ईश्वराने वेदात सांगितल्यानुसार न चालता, वेगळा विचार करत असतो आणि त्यानुसार गोष्टी घडवण्याचा प्रयत्न करत असतो पण ईश्वर सर्वांचा नियंता असल्याने संपूर्ण परिस्थिती त्याच्याच ताब्यात असते. ईश्वराने निरनिराळ्या देवतांची निर्मिती सृष्टीचे संचालन व्यवस्थित चालावे म्हणून केली असल्याचे आपण समजून घेतले. वास्तविक पाहता ह्या निरनिराळ्या देवीदेवता ही एकाच ईश्वराची निरनिराळी रूपे आहेत हे आपण अभ्यासत असलेल्या श्लोकातून लक्षात येते. असे जरी असले तरी स्वत:च्या डोक्याने चालणारे लोक ईश्वराला बाजूला सारून त्या निरनिराळ्या देवतांची उपासना करत असतात. ईश्वर माणसाच्या असमंजस वागण्याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या उपासनेचे फल त्यांना देत असतो. ईश्वराचे सगुण रूप असलेले बाप्पा ही बाब स्पष्ट करताना पुढील श्लोकात सांगतात की, जो माझी ज्या रूपात उपासना करेल त्या त्या रूपात मी त्यांना दर्शन देतो.
येन येन हि रूपेण जनो मां पर्युपासते ।
तथा तथा दर्शयामि तस्मै रूपं सुभक्तितऽ ।। 40।।
अर्थ- ज्या ज्या रूपाने लोक माझी उपासना करतात त्या त्यारुपात मी त्यांना दर्शन देतो.
विवरण- ईश्वराने सृष्टीचालनासाठी निरनिराळ्या देवता निर्माण करून त्यांना कामे वाटून दिलेली आहेत. वास्तविक पाहता ही सर्व ईश्वराचीच निरनिराळी रूपे आहेत पण मनुष्य निरनिराळ्या देवता निर्मितीचे कारण समजून न घेता, आपापल्या कल्पनेने त्याच्या अनेक रूपाना निरनिराळ्या देवता मानून त्यांची स्वतंत्र उपासना करत असतो. खरं तर ही ईश्वराचीच उपासना होत असते. माणसाच्या बुद्धीवर मायेचा प्रभाव असल्याने त्याच्या मनात अशा वेगवेगळ्या कल्पना येत असतात आणि तो त्याच खऱ्या मानून बसतो. एकदा माझंच बरोबर आहे असं वाटू लागलं की, इतर कुणाचं काहीच ऐकून न घेता सांगणाऱ्यालाच वेड्यात काढलं जातं. त्यामुळे गैरसमजातून लोक निरनिराळ्या देवतांची उपासना करतात आणि ईश्वरही त्यामागची त्यांची भूमिका समजाऊन घेऊन त्यांच्या भक्तीला भुलून त्यांना त्या त्या रूपात दर्शन देत असतो.
क्रमश: