जगातील सर्वात मोठा रेल्वेप्रवास
13 देश फिरण्याचा मिळतो आनंद, लागतात 21 दिवस
भारतातील सर्वात मोठा रेल्वेप्रवास कोणता या प्रश्नाचे उत्तर अनेकांना माहित असेल. भारतातील सर्वात मोठा रेल्वेप्रवास डिब्रूगढ ते कन्याकुमारीपर्यंतचा आहे. 4273 किलोमीटर लांब हा प्रवास विवेक एक्स्प्रेस 80 तास 15 मिनिटांमध्ये पूर्ण करते. विवेक एक्स्प्रेस हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 9 राज्यांमधून धावते आणि यादरम्यान सुमारे 55 स्थानकांवर थांबते. परंतु जगातील सर्वात लांब रेल्वेप्रवासाचा अनुभव रोमांचक अणि अनोखा आहे. यापूर्वी लंडन ते सिंगापूरपर्यंतचा रेल्वेमार्ग सर्वात मोठा मानला जात होता. परंतु आता नव्या मार्गाने याचे स्थान घेतले आहे.
जगातील सर्वात मोठा रेल्वेप्रवास 18,755 किलोमीटरचा असून हा प्रवास 21 दिवसांमध्ये पूर्ण होतो. हवामानाचा अडथळा निर्माण झाला तर या प्रवासाला आणखी कालावधी लागू शकतो. या रेल्वेप्रवासाची सुरुवात पोर्तुगालच्या अल्गार्व क्षेत्रातून होते. हा रेल्वेप्रवास 13 देशांमधून पूर्ण होतो अणि याच्या दीर्घ अंतरात केवळ 11 थांबे आहेत. याचा अद्भूत रेल्वेमार्ग पोर्तुगालच्या लागोस शहरापासून सिंगापूरपर्यंत फैलावलेला आहे.
पॅरिस, मॉस्कोमध्ये थांबते रेल्वे
याच्या मार्गात येणाऱ्या 13 देशांमध्ये स्पेन, फ्रान्स, रशिया, चीन, व्हिएतनाम, थायलंड आणि सिंगापूर यांचा मुख्यत्वे समावेश आहे. ही रेल्वे जगातील प्रसिद्ध शहरं पॅरिस, मॉस्को, बीजिंग आणि बँकॉकहून धावते. जेव्हा ही रेल्वे एखाद्या शहराच्या स्थानकावर थांबते तेव्हा त्या रात्री तिचा स्टॉप असतो. जेणेकरून प्रवाशांना तेथे उतरून हिंडता येईल, वेगवेगळ्या संस्कृतींचा अनुभव घेता येईल. यामुळे या प्रवासाचा रोमांच आणखी वाढतो.
किती आहे तिकीट
जगातील या सर्वात लांब रेल्वेप्रवासाचे तिकीट सुमारे 1350 डॉलर्सचे आहे. भारतीय रुपयात हे तिकीट सुमारे एक लाख 14 हजारांचे आहे. परंतु इतक्या लांब रेल्वेप्रवासाच्या आणि अनेक देशांमध्ये फिरता येणार असल्याने हे अत्यंत किफायतशीर आहे. हा रेल्वेप्रवास हवाईप्रवासाच्या तुलनेत एक नवा दृष्टीकोन प्रदान करतो. तिकीट बुक केल्यास खाण्याची किंवा राहण्याची चिंता करण्याची गरज नाही. या तिकीटाच्या किमतीत सर्वकाही सामील आहे. खाणे, पिणे आणि प्रवासादरम्यान आरामदायक वास्तव्याची सुविधा यात आहे. ही ऑल-इंक्लूसिव्ह सेवा प्रवाशांना कुठल्याही लॉजिस्टिक त्रासाशिवाय प्रवासाचा पूर्ण आनंद घेता येईल हे सुनिश्चित करते.
अनेक कंपन्यांचा सहभाग
हा रेल्वेप्रवास साकार करण्यासाठी विविध रेल्वे कंपन्या आणि संघटनांनी मिळून काम केले आहे. अलिकडेच लाओस आणि चीनदरम्यान एक नवा रेल्वेमार्ग सुरू झाल्याने युरोपला आशियाशी जोडणे सुलभ ठरले आहे. या पुढाकाराचा उद्देश लाओसच्या अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि पोर्तुगाल ते सिंगापूरपर्यंत एक रोमांचक प्रवासाचा अनुभव प्रदान करणे आहे.