जगातील सर्वात लांब काचेचा पूल खुला
492 फुटांच्या उंचीवरील काचेचा पूल
अनेकांना अधिक उंचीवर गेल्यास भीती वाटू लागते. अशा लोकांना विमानात बसण्यासही भीती वाटते. अशाप्रकारचय लोकांच्या हृदयाचे ठोके एक पूल पाहून निश्चितच वाढतील. हा पूल काचेद्वारे तयार करण्यात आला असून यावर चालणारे लोक स्वतःच्या पायांखाली पाहण्यास घाबरू शकतात.
व्हिएतनामध्ये हा अनोखा पूल वनक्षेत्रामध्ये तयार करण्यात आला आहे. या ब्रिजचे नाव बॅक लॉन्ग असून याचा इंग्रजीत अर्थ ‘व्हाइट ड्रगन’ असा होतो. हा जगातील सर्वात लांबीचा काचेचा पूल असल्याचा दावा करण्यात येतो. परंतु अद्याप गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने या दाव्याची पुष्टी केलेली नाही.
450 जणांना सामावणारा पूल
हा ब्रिज 632 मीटर लांब म्हणजेच सुमारे 2,073 फुटांचा आहे. याची उंची 150 मीटर म्हणजेच 492 फूट इतकी आहे. ब्रिजचा फ्लोर प्रेंच निर्मात्यांकडून तयार करण्यात आलेल्या विशेष प्रकारच्या टेंपर्ड ग्लासपासून निर्माण करण्यात आला आहे. या काचेचया पूलावर एकाचवेळी 450 लोक चालू शकतात. ग्लास फ्लोर असल्याने पर्यटकांना परिसरातील सौंदर्य सहजपणे दिसू शकते.
जगात आणखीन काचेचे ब्रिज
चीनच्या गुआंगडॉन्गमध्ये 526 मीटर लांबीचा एक ग्लास बॉटम ब्रिज आहे. याचबरोबर 1600 फुटांचा एक ग्लास बॉटम ब्रिज मागील वर्षी पोर्तुगालमध्ये खुला झाला होता.