जगाला एका नवीन व्यवस्थेची गरज
ग्लोबल साउथ देशांशिवाय जागतिक संस्था विनानेटवर्क मोबाईलसारखी : ब्रिक्समध्ये नरेंद्र मोदींचे सुतोवाच
वृत्तसंस्था/ रिओ डी जानेरो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ब्रिक्स शिखर परिषदेत नवीन जागतिक व्यवस्थेची मागणी उपस्थित करत आज जगाला बहुध्रुवीय आणि समावेशक व्यवस्थेची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. या नवीन व्यवस्थेचा प्रारंभ जागतिक संस्थांमधील बदलांपासून करावा लागेल, असे सुतोवाचही पंतप्रधानांनी केले.
‘20 व्या शतकात निर्माण झालेल्या जागतिक संस्था 21 व्या शतकातील आव्हानांना तोंड देण्यात अपयशी ठरल्या आहेत. ‘एआय’च्या युगात, तंत्रज्ञान दर आठवड्याला अपडेट केले जाते, परंतु जागतिक संस्था 80 वर्षांतून एकदाही अपडेट केली जात नाही. 20 व्या शतकातील टाइपरायटर 21 व्या शतकातील सॉफ्टवेअर चालवू शकत नाहीत, असे दाखलेही पंतप्रधान मोदी यांनी ‘ब्रिक्स’ देशांच्या उपस्थित प्रतिनिधींसमोर दिले. 17 वी ब्रिक्स शिखर परिषद ब्राझीलमधील रिओ डी जानेरो येथे रविवारपासून सुरू झाली आहे. भारताच्यावतीने पंतप्रधान मोदी त्यात सहभागी झाले आहेत. ते आजपासून ब्राझीलच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.
ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल साउथच्या समस्यांवर भाष्य केले. ‘ग्लोबल साउथमधील देश अनेकदा दुहेरी मानकांचे बळी ठरले आहेत. मग ते विकास असो, संसाधने असोत किंवा सुरक्षेशी संबंधित समस्या असोत. ग्लोबल साउथला कधीही प्राधान्य दिले गेले नाही. ग्लोबल साउथ देशांशिवाय जागतिक संस्था सिमकार्ड असूनही नेटवर्क नसलेल्या मोबाईल फोनसारख्या आहेत’, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. जागतिक अर्थव्यवस्थेत मोठे योगदान असलेल्या देशांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही. हा केवळ प्रतिनिधित्वाचा प्रश्न नाही तर विश्वासार्हता आणि परिणामकारकतेचा देखील प्रश्न आहे, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.
ग्लोबल साउथला हवामान वित्त, शाश्वत विकास आणि तांत्रिक प्रवेश यासारख्या मुद्यांवर केवळ प्रतिकात्मक पाठिंबा मिळाला आहे. विकास संसाधनांचे वितरण आणि सुरक्षितता यासारख्या बाबींमध्ये ग्लोबल साउथसोबत दुहेरी वृत्ती स्वीकारली गेली आहे. या देशांच्या खऱ्या गरजांकडे दुर्लक्ष केले जात असून फक्त नाममात्र मदत दिली जात असल्याकडेही पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधले.
भारत जागतिक हितसंबंधांमध्ये योगदान देण्यास वचनबद्ध
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारताने नेहमीच मानवतेच्या हितांना प्राधान्य दिले आहे आणि ब्रिक्स देशांसह सर्व महत्त्वाच्या मुद्यांवर रचनात्मक योगदान देण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहे. भारताने कधीही केवळ स्वत:च्या फायद्यासाठी काम केले नाही तर जगाच्या कल्याणासाठी काम केले असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
चीन, रशियाच्या राष्ट्रपतींची दांडी
ब्राझीलमधील परिषदेला चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भाग घेतला नाही. तथापि, पंतप्रधान मोदींसह इतर सदस्य देशांचे नेते परिषदेत उपस्थित होत. अन्य प्रतिनिधींनीही जागतिक मुद्यांवर विचार मांडले. ब्रिक्सच्या विस्ताराबद्दल बोलताना नवीन देशांचे स्वागत करत या संघटनेत काळानुरूप स्वत:ला जुळवून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.