महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऑलिम्पिकच्या वर्तुळात जग!

06:40 AM Jul 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जगात कुठे युद्ध सुरू आहे तर कुठे निरंकुश सत्तेसाठी घनघोर लढाई, कुठे उन्हाचा मार तर कुठे पावसाचे झोडपणे, कुठे भूकंपाचा हादरा तर कुठे चक्रीवादळाचा तडाखा... अन अनारोग्य, उपासमार आणि चिंता या सगळ्या रोजच्या रड्याला मागे टाकून फ्रान्समध्ये पाच रंगांच्या वर्तुळात एक जग आनंद शोधत आहे. ऑलिम्पिकच्या भव्य आयोजनाने इथले गढूळ वातावरण कुठल्या कुठे पळून गेले आहे आणि शानदार उद्घाटन सोहळ्याने जगाचे डोळे दीपवली आहेत. शंभर वर्षांपूर्वी ज्या तारखेला हा सोहळा संपला त्याच तारखेला शंभर वर्षाने पुन्हा सुऊवात करून फ्रान्सने आपली जिद्द खरी करून दाखवली आहे. जगातील अनेक देश विविध क्रीडा प्रकारातील अद्भूत खेळ पाहायला आसुसले आहेत. खेळावर प्रेम करणारा प्रत्येक नागरिक आपल्या देशाच्या नसलेल्या खेळाडूच्याही चांगल्या कामगिरीचे कौतुक करताना हरखून गेलेला दिसत आहे. जगातला उत्तम उत्तम खेळाडूंचे आणि त्यांच्या खेळाचे दर्शन होतानाच त्यांच्याबद्दलची आपली भावना व्यक्त करणारे हे लोक म्हणजेच तुम्ही आम्ही आहोत. एका जगाचे नागरिक. असंख्य खेळ प्रकारात होणारी धमाल आणि कमाल पाहणाऱ्यांना थक्क करून सोडत आहे. येथे एखाद्या खेळाडूचे नाव घ्यावे तर असंख्यांवर अन्याय. ऑलम्पिकची मशाल जशी एका हातातून दुसऱ्या हातात जात होती. जगातील सर्वोत्तम खेळाडू ती पुढे पुढे घेऊन येत होते आणि अंतिम पडावावर एकातून आणखी एक मशाल प्रज्वलित करून एक खेळाडू जोडपे जेव्हा एका भव्य बलूनला प्रज्वलित करते झाले तेव्हा जगाने जणू चंद्रोदय अनुभवला. सगळ्या जगाची वेळ जुळून आली आहे असे क्षणभराचे ते वातावरण सगळ्या चिंता, दु:ख, वेदना यांना मागे सारून तळपू लागले. अद्भूत असा तो नजारा क्रीडा प्रेमींनी काळजात साठवून ठेवला आहे. जणू या क्रीडा कुंभमेळ्याचे सार्थक व्हावे असेच हे क्षण. पुढे आणखी शंभर वर्षांनी कधीतरी पॅरिस असेच तळपून उठेल आणि मागच्या शंभर वर्षांचा इतिहास सांगितला जाईल तेव्हा कदाचित त्या सोहळ्याची चित्रफीत सुद्धा अगदी ताज्या क्षणाला पाहतो अशी लोकांच्या समोर उभी राहील. तंत्रज्ञानाने ती सोय केली आहे. भविष्यात कधीतरी पुन्हा मागे डोकावून पाहण्याचा कोणी प्रयत्न करेल तेव्हा हे सुवर्णक्षण पुन्हा जिवंत होतील ही कल्पनाच रोमांचक आहे.

Advertisement

सगळ्या जगाचा इतिहास या निमित्ताने आठवता येणार नाही.  आपल्या भारताने जेव्हा हा क्रीडा कुंभमेळा सुरू झाला तेव्हा पारतंत्र्यात असताना सुद्धा आपली नाममुद्रा इथल्या पदक तालिकेवर उमटवली होती हा इतिहास वाचताना खरोखरच अंगावर रोमांच उभे राहते. फ्रान्सची राजधानी पॅरिस तिसऱ्यांदा ऑलिंपिकचं यजमानपद भूषवत आहे. या शहरातूनच भारताच्या ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा प्रवास सुरू झाला. आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीच्या रेकॉर्डनुसार तेव्हापासून आजपर्यंत भारताच्या खात्यात 10 सुवर्ण, 9 रौप्य आणि 16 कांस्य अशी एकूण 35 ऑलम्पिक पदके जमा आहेत. 1900 साली नॉर्मन प्रिचर्ड यांनी भारताकडून पहिल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन रौप्यपदकांची कमाई केली होती. त्यांनी 200 मीटर अडथळ्याची शर्यत आणि 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत ही रौप्यपदकं मिळवली आणि तेव्हा भारतावर राज्य असणाऱ्या ब्रिटनचा दावा नाकारून ऑलिम्पिक समितीने ती पदके भारताच्या नावावरच लिहिली होती. हे तर कलकत्त्याच्या एका नागरिकांनी मिळवलेले पारतंत्र्यातील स्वातंत्र्यच म्हणायचे! तेही 47 वर्षे आधी!! 1928 सालच्या ऑलिम्पिकमध्ये भारताने पहिल्यांदा हॉकीचे सुवर्णपदक मिळवले आणि भारतात हॉकीचा सुवर्णकाळ सुरू झाला. भारताच्या पुरुष हॉकी संघाने अॅमस्टरडॅम 1928, लॉस एंजेलिस 1932, बर्लिन 1936 अशा सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदके पटकावली. नंतर लंडन 1948, हेलसिंकी 1952 आणि मेलबर्न 1956 या सलग तीन ऑलिम्पिक या स्पर्धांमध्येही  तोच विक्रम पुन्हा केला. त्यानंतर पुन्हा 60, 64, 68, 72,1980 आणि 2020 मध्ये कांस्य, रौप्य, सुवर्ण अशी कामगिरी केली. कोल्हापूरच्या खाशाबा जाधव यांनी 1952 साली हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या बँटमवेट प्रकारात कांस्य पदक जिंकले आणि स्वतंत्र भारताचे ते ऑलिम्पिकमधले पहिलेच वैयक्तिक पदक ठरले. पुन्हा भारताच्या वाट्याला दीर्घकाळ वनवास आला. टेनिसस्टार लिअँडर पेसने 1996 साली अमेरिकेच्या अटलांटा शहरात झालेल्या ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत कांस्यपदक मिळवले. नव्या सहस्त्रकात 2000 साली सिडनी इथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीने 69 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले. ती पहिली महिला पदक विजेती ठरली. नेमबाजीत भारताचे नाव गाजवत राज्यवर्धन राठोड यांनी अथेन्समध्ये रौप्यपदकाची कमाई केली. या पदकाने सैन्यातील या अधिकाऱ्याला खासदार आणि क्रीडा राज्यमंत्री बनवले. भारताची सुवर्णपदकाची आस बीजिंग इथे 2008 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत अभिनव बिंद्राने 10 मीटर एअर रायफल प्रकारात पूर्ण केली.ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक मिळवणारा अभिनव पहिला भारतीय खेळाडू ठरला. बीजिंगमध्ये पैलवान सुशील कुमार आणि बॉक्सर विजेंदर सिंग यांनीही कांस्य पदकावर नाव कोरले. पुढे उत्तर लंडन ऑलिंपिकमध्ये भारताने सहा पदकांची कमाई केली. गगन नारंग, मेरी कोम, सुशील कुमार, विजय कुमार, सायना नेहवाल, योगेश्वर दत्त यांनी ती मिळवली. ब्राझीलमधल्या रिओ दी जानिरो इथे पी. व्ही. सिंधूचे रौप्य आणि साक्षी मलिकचे कांस्य अशा दोन पदकांवरच भारताला समाधान मानावे लागले. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक  प्रकारात सुवर्णपदक जिंकले  आणि पुन्हा नवा आरंभ झाला. सायखोम मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगचं रौप्यपदक मिळवत भारताचे खाते खोलले. पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटन महिला एकेरीत कांस्य तर लवलिना बोर्गोहाईनने महिलांच्या वेल्टरवेट बॉक्सिंगमध्ये कांस्य, कुस्तीत रवि दाहियाने रौप्य तर बजरंग पुनियाने कांस्य तर पुऊषांच्या हॉकी टीमनेही कांस्य पदकाची कमाई केली. भारतीयांनी त्या स्पर्धेत एकूण 7 पदके जिंकत आजवरची सर्वोत्तम कामिगिरी नोंदवली. आता पॅरिसमध्येही  भारताची नेमबाज मनू भाकर हिने कांस्य पदक पटकावून चांगली सुरूवात केली आहे.

Advertisement

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article