आपल्या वाट्याला आलेलं काम हे ईश्वरानं दिलेलं काम आहे
अध्याय चौथा
यदेव प्राप्यते त्यागात्तदेव योगतऽ फलम् । संग्रहं कर्मणो योगं यो विन्दति स विन्दति ।। 5 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार निरपेक्षतेने कर्म करणाऱ्या व्यक्तीलासुद्धा मोक्षप्राप्ती होते असं बाप्पा म्हणतात. बाप्पांच्या सांगण्यावर विचार केला असता लक्षात येते की, संन्याशाला मोक्षप्राप्ती नक्कीच होते तशी ती निरपेक्षतेने कर्म करणाऱ्याला सुद्धा होते. काही लोक मात्र वाट्याला आलेले काम आवडत नाही किंवा आळशी स्वभावामुळे टाळायचे असते म्हणून संन्यास घेतो असं म्हणतात पण त्यांनी घेतलेला संन्यास पोकळ असतो.
अर्जुनालासुद्धा स्वजनांचा मोह पडल्याने त्यांना मारायची इच्छा होत नव्हती, म्हणून तो श्रीकृष्णाला म्हणाला की, मी आता संन्यास घेतो. त्यावर भगवंतांनी त्याच्या अशा संन्यास घेण्याला काहीही अर्थ नसून केवळ कर्तव्यकर्म टाळण्यासाठी केलेली युक्ती ह्यापलीकडे त्याला काही महत्त्व नाही हे समजावून सांगितले. जाणकार लोक ह्या पद्धतीने अंगचोरपणा करण्याला संन्यास मुळीच म्हणत नाहीत. संन्यासी व्यक्तीला मनापासून संसाराची आवड नसते. त्यामुळे त्यांना मुद्दामहून संसाराचा, संसारिक कर्मांचा त्याग करावा लागत नाही. ते त्यांच्याकडून स्वाभाविकपणे घडते. कोणतीही गोष्ट स्वाभाविकपणे केली की, केलेल्या गोष्टीचे विचार पुन्हा मनात येत नाहीत. उदाहरणार्थ एखाद्याने मनापासून काही दिलं तर त्या देण्याचे विचारसुद्धा त्याच्या मनात येत नाहीत कारण त्याला त्यांना परतफेडीची अपेक्षा नसते.
ह्याउलट प्रसंगानुरूप द्यायलाच पाहिजे म्हणून काही दिलं की, त्या देण्याचे विचार नेहमीच मनात येत असतात व दुसऱ्या एखाद्या प्रसंगी त्यानं आपल्याला काय दिलं त्याच्याशी आपल्या देण्याची तुलना केली जाते. म्हणजेच त्या देण्याघेण्याला काही अर्थ नसतो. तसंच जे मनापासून संन्यास घेत नाहीत केवळ कर्म टाळण्याचा उद्देश त्यामागं असतो त्यांच्या मनात संसारिक गोष्टींचे त्यातील व्यक्तींचे विचार सतत येत असतात. सामान्य संसारी माणसाची ही अशी अवस्था असते. कर्मयोग आचरणारा मनुष्य संसारात राहून कोणतीही अपेक्षा न ठेवता कर्म करत असतो. जेव्हा त्याच्या मनात कर्मफळाचा त्याग करण्याचा दृढनिश्चय होतो तेव्हा तो संसारात असूनसुद्धा हळूहळू मनाने संन्यासी होऊ लागतो. त्याच्या मनात समोरचं जग तात्पुरतं असून आपला उध्दार होण्याच्या दृष्टीने काहीच उपयोगी नाही हे पक्कं ठसलेलं असल्याने त्याला जगातील व्यक्ती, वस्तू व परिस्थिती ह्यातून कोणतीच अपेक्षा उरलेली नसते.
सबब वाट्याला आलेलं कर्म म्हणजे संसारिक कर्तव्ये करावीत आणि बाजूला व्हावं असा त्याचा सहजस्वभाव होतो. साहजिकच केलेल्या कर्माबद्दल किंवा त्यापासून मिळणाऱ्या फळाबद्दल कोणतेही विचार त्याच्या मनात येत नाहीत आणि संन्यासी व्यक्तीकडून हेच अपेक्षित असतं. अशा प्रकारे संसारात राहून सुद्धा कर्मयोगी, संन्यासीवृत्तीने रहात असल्याने संन्याशाला मिळणारा मोक्ष त्यालाही मिळतो. आपणसुद्धा दैनंदिन व्यवहारात नावडती कामं टाळण्यासाठी काहीतरी सबबी शोधत असतो पण असं करणं चुकीचं आहे कारण आपल्या वाट्याला आलेलं काम हे ईश्वरानं आपल्याला दिलेलं काम आहे आणि ते चोख करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्याही पुढे जाऊन ते कर्म जो निरपेक्षतेने पार पडेल तो बाप्पांचा लाडका होतो. अशाप्रकारे कर्तव्य निरपेक्षतेनं पार पाडत असलेला मनुष्य पापरहित, शुद्ध चित्त असून आत्मस्वरूप जाणल्याने इंद्रिये जिंकलेला असतो. तो योगतत्पर असल्याने कर्म करीत असला तरी त्याने लिप्त होत नाही. असे बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
क्रमश: