उपनोंदणी कार्यालयाचे काम ठप्प
नवीन कायद्याच्या अंमलबजावणीविषयी स्पष्टता होईपर्यंत काम बंद
बेळगाव : नोंदणी कायदा 1908 मध्ये नवीन कलम 22 बी लागू करण्याचे निर्देष राज्य सरकारने दिले आहेत. याबाबत योग्य निर्देष जारी होईपर्यंत नेंदणी कागदपत्रांची पडताळणी तसेच नवीन नेंदणी थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मंगळवारी बेळगाव उपनोंदणी कार्यालयासमोर शुकशुकाट दिसून आला. कामानिमित्त आलेल्या नागरिकांना पुन्हा माघारी फिरावे लागले. नव्या कायद्यामुळे बनावट आधार कार्डद्वारे नेंदणी केल्यास संबंधित उपनोंदणी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. बेळगावसारख्या मोठ्या शहरांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात नोंदणी होते. त्यामुळे प्रत्येक कागदपत्रांची पडताळणी करणे अधिकाऱ्यांना शक्य नसते. वेळेची मर्यादा असल्यामुळे काहीवेळा चुका होऊ शकतात. परंतु नव्या कलमामुळे आता अधिकारी कारवाईच्या कचाट्यात सापडणार असल्याने संपूर्ण राज्यभर उपनेंदणी कार्यालयाचे काम ठप्प आहे.
लाखो रुपयांचा फटका
मंगळवारी उपनोंदणी कार्यालयातील कामकाज ठप्प असल्याने लाखो रुपयांचा फटका बसला. जमीन खरेदी-विक्रीसह इतर नोंदणीचे काम ठप्प होते. नोंदणीतून दररोज लाखो रुपयांचे उत्पन्न राज्य सरकारला होते. परंतु कामकाज ठप्प असल्याने हा महसूल बुडाला. उपनोंदणी कार्यालयातही शुकशुकाट दिसून आला.