For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

किल्ला येथील भाजीमार्केट दुकानगाळे हटविण्याचे काम सुरू

11:27 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
किल्ला येथील भाजीमार्केट दुकानगाळे हटविण्याचे काम सुरू
Advertisement

महिनाभरात काम पूर्ण होण्याची शक्यता : पार्किंगतळ उभारण्याबाबत चाचपणी

Advertisement

बेळगाव : किल्ला येथील जुने भाजीमार्केटमधील दुकानगाळे पाडण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मागील दोन दिवसांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डकडून या कामाला गती देण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने हे काम पूर्ण केले जाणार असून त्यानंतर खुल्या जागेचा कशा पद्धतीने वापर करता येईल, याचा विचार केला जाणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हद्दीतील जुने भाजीमार्केट मागील चार वर्षांपासून पडून आहे. याठिकाणी असणारे होलसेल भाजीमार्केट एपीएमसी मार्केटयार्ड येथे हलविण्यात आल्याने किल्ला येथील जागा तशीच पडून होती. याठिकाणी मद्यपींचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्याचबरोबर इतर नशेचे प्रकारही सुरू असल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डने याठिकाणचे दुकानगाळे हटविण्याचा निर्णय घेतला. जुलै महिन्यात झालेल्या कॅन्टोन्मेंट बैठकीत भाजीमार्केट काढण्यासंदर्भात मंजुरी देण्यात आली. मागील दोन दिवसांपासून किल्ला भाजीमार्केट येथील दुकानगाळे हटविण्याचे काम कंत्राटदाराने सुरू केले आहे. दुकानगाळ्यांची संख्या अधिक असल्यामुळे पुढील महिनाभर तरी हे काम सुरू राहण्याची शक्यता आहे. दुकानगाळे हटविल्यास  याठिकाणी सुरू असणारे अवैध धंदे बंद होणार आहेत. तसेच या जागेचा योग्य वापरही भविष्यात होऊ शकतो.

पार्किंगतळाद्वारे महसूल मिळणार...

Advertisement

किल्ला भाजीमार्केट हा परिसर मध्यवर्ती बसस्थानकाशेजारीच आहे. त्यामुळे या ठिकाणी खासगी वाहनांची मोठ्या संख्येने ये-जा असते. तसेच आराम बस पार्किंग करण्यासाठी जागाही उपलब्ध नाही. त्यामुळे या खुल्या जागेत पार्किंगतळ उभारावे, अशी सूचना बोर्डच्या बैठकीत मांडण्यात आली होती. यामुळे कॅन्टोन्मेंटला महसूल मिळणार असून पार्किंगची समस्याही सोडविली जाणार आहे.

Advertisement
Tags :

.