मातीचे ढिगारे हटविण्याचे काम सुरूच
कारवार जिल्ह्यात रेड अलर्ट : दहा तालुक्यांतील शाळांना आज सुटी
कारवार : अंकोला तालुक्यातील शिरुर येथे राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर कोसळलेली दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. तथापि, घटनास्थळी कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आणखी दरड कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे दरड हटविण्याच्या कामावर मर्यादा येत आहेत. गुरुवारी हवामान खात्याने कारवार जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर, भटकळ, जोयडा, दांडेली, यल्लापूर, शिरसी आणि सिद्धापूर या 10 तालुक्यांतील शाळा व पदवीपूर्व महाविद्यालयांना गुरुवारी सुटी जाहीर केल्याची माहिती कारवार जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया यांनी दिली आहे. दरड कोसळलेल्या ठिकाणी डोंगरावरून पाण्याचे झरे वाहत असल्यामुळे दरड हटविण्याचे काम जिकिरीचे बनले आहे.
मंगळवारी शिरुर येथे राष्ट्रीय हमरस्त्यावर दरड कोसळली. दरड कोसळल्याने एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींसह अन्य 10 ते 15 जण बेपत्ता झाल्याची बाब व्यक्त केली जात आहे. शिवाय दोन गॅसची वाहतूक करणारे टँकर गंगावळी नदीत वाहून गेले आहेत. टँकर नदीबाहेर काढण्यात अद्याप यश आले नाही. बेपत्तांपैकी त्या दुर्दैवी कुटुंबापैकी तीन व्यक्तींसह चार जणांचे मृतदेह सापडले आहेत. एक मृतदेह अज्ञात व्यक्तीचा आहे.
मंगळवारी सापडलेल्या लक्ष्मण नाईक, शांती नाईक आणि रोशन यांच्यावर शिरुर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रीय हमरस्त्यावर कोसळलेली दरड हटविण्याचे कार्य मंगळवारपासून हाती घेण्यात आले आहे. यासाठी जेसीबी, लॉरीची मदत घेण्यात आली. दरड हटविण्यासाठी भारतीय नौसेना, एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दल, आयआरबी बांधकाम कंपनीचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. रस्त्यावर कोसळलेल्या दरडीचे प्रमाण इतके भयानक आहे की वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल. दरड कोसळल्यामुळे या महत्त्वाच्या रस्त्यावरील वाहतूक मंगळवारी साडे अकरा वाजल्यापासून ठप्प झाली आहे. त्यामुळे घटनास्थळाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. गेले अनेक तास वाहने एकाच ठिकाणी थांबून राहिल्याने वाहनचालक व वाहकांना जेवणासाठीही मोठी धडपड करावी लागत आहे, असे सांगण्यात आले.
जीवितहानीसंबंधी गुन्हे दाखल करण्याची सूचना
कारवार जिल्हा पालकमंत्री आणि मासेमारी मंत्री मंकाळू वैद्य यांनी दरड कोसळण्याचे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. दरड कोसळल्याने जीवितहानी झाली आहे. याला सर्वस्वी आयआरबी बांधकाम कंपनी आणि राष्ट्रीय हमरस्ता प्राधिकरणाचे अधिकारी जबाबदार आहेत. त्याकरिता तातडीने बांधकाम कंपनीच्या आणि प्राधिकारच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची सूचना मंत्री वैद्य यांनी कारवार जिल्हा पोलीसप्रमुख मंजुनाथ व वनखात्याच्या अधिकाऱ्यांना केली. अंकोला येथील अतिथीगृहात दरड दुर्घटनेत मयत झालेल्या कुटुंबीयांना सरकारी मदतीचा धनादेश दिला.
दरड कोसळण्यास बांधकाम कंपनीच जबाबदार
जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील उत्तर टोकापासून (कारवार तालुका) दक्षिण टोकापर्यंतच्या (भटकळ, तालुका राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66) रुंदीकरणाचे काम आयआरबी बांधकाम कंपनीकडून हाती घेण्यात आले आहे. कंपनीच्या चुकीच्या आणि अवैज्ञानिक बांधकामामुळे राष्ट्रीय हमरस्त्यावर दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत, अशी तक्रार सर्वसामान्य जनतेसह कारवार-अंकोलाचे आमदार सतीश सैल यांनी केली आहे. बांधकाम कंपनीने चुकीच्या पद्धतीने रस्ता रुंदीकरणासाठी डोंगर-टेकड्या कापल्या आहेत, असे सैल यांनी स्पष्ट केले.