पोलीस खात्याचे कार्य लोककेंद्रित
गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांचे प्रतिपादन
बेंगळूर : पोलीस खाते जनस्नेही आणि नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, अशा पद्धतीने लोककेंद्रित पद्धतीने काम करत आहे. गेल्या दोन वर्षात सरकार आणि पोलिसांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. लोकाभिमुख पद्धतीने काम करणे हे पोलीस खात्याचे उद्दिष्ट आहे, असे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी सांगितले. कर्नाटक राज्य पोलीस आणि रेनॉल्ट निस्सान टेक्नॉलॉजी अॅण्ड बिझनेस सेंटर इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बेंगळूर शहर पोलीस विभागाला ‘हायजीन ऑन गो’ वाहने हस्तांतर करण्यात आली. तसेच पोलीस खात्याचे ‘प्रगती स्तंभ’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
नवीन उपक्रमांची अंमलबजावणी करून पोलीस खात्यात अनेक बदल घडवून आणले आहेत. राज्य पोलीस खात्याने जनतेसाठी स्नेहभावनेने काम करावे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या बाबतीत इतरांना त्रास होऊ नये. बदललेल्या परिस्थितीत तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्ह्यांचा तपास केला जात आहे, असे त्यांनी सांगितले. नागरिकांना न्याय देण्यात कर्नाटक पोलीस संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकावर आहेत. इंडिया जस्टिस रिपोर्टने विविध निकषांवर आधारित सर्वेक्षण अहवाल दिला आहे. कर्नाटकने 10 पैकी 6.78 गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. पोलीस आणि न्यायव्यवस्था एकत्रितपणे काम करतात. देशात प्रथमच राज्यात 33 डीसीआरई स्टेशन स्थापन करण्यात आले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
ड्रग्जमुक्तीसाठी कोणतीही तडजोड नाही!
कर्नाटकाला ड्रग्जमुक्त करण्यासाठी अँटी-नार्कोटिक्स टास्क फोर्स (एएनटीएफ) स्थापन करण्यात आले आहे. गेल्या 11 महिन्यांत, बेंगळूर शहरात 160 कोटी रुपयांचे विविध प्रकारचे 1,407 किलो ड्रग्ज आढळून आले आहेत. ड्रग्जविक्रीत सहभागी असलेल्या 300 हून अधिक विदेशी नागरिकांना हद्दपार करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.